जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी सोने आणि चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला होता. सोमवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दराने शनिवारचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ट्रम्प टॅरिफच्या भीतीमुळे काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. सोमवारी देखील सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे रूपयाचे ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरलेले मूल्य. रुपया कमजोर झाल्यानंतर आयात खर्च वाढल्याने दोन्ही धातुंच्या किमती दररोज नवीन उच्चांक गाठताना दिसत आहेत.

याशिवाय, जागतिक बाजारपेठेकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने विशेषतः गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक साधनांमध्ये कल वाढला आहे. ज्यामुळे देखील सोने आणि चांदीच्या किंमत वाढीला चालना मिळाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या ५० टक्के आयात शुल्कामुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता निर्माण झाल्याने त्याचा भारताच्या जीडीपीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त आहे.

गुंतवणूकदारांनी आपली भांडवली गुंतवणूक सोने-चांदी यासारख्या सुरक्षित साधनांकडे वळवली आहे. चांदीची औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे. तरी देखील जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्यालाच सुरक्षित गुंतवणुकीचे प्रमुख साधन मानले जात आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही मौल्यवान धातूंनी टप्याटप्याने नवे उच्चांक गाठले असून, यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास सातत्याने टिकून आहे. पैकी सोन्याने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

दुसरीकडे, चांदीची किंमतही सातत्याने वाढत आहे आणि औद्योगिक वापरामुळे तिची दीर्घकालीन शक्यता अधिक मजबूत दिसत आहे. येत्या काळात कमकुवत रुपया तसेच जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडी यावरच सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून असण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

जळगावमध्येही सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. जगभरातील बाजारपेठांमध्ये अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढत असताना, जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख सात हजार १२० रूपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच प्रति १० ग्रॅम १३३९ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोन्याच्या दराने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत मजल मारून नवा उच्चांक निर्माण केला.

चांदीत २५७५ रूपयांची वाढ

जळगावमध्ये शनिवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २५ हजार ६६० रूपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच प्रति किलो २५७५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीच्या दराने जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार २३५ रूपयांपर्यंत झेप घेतली.