नाशिक: सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी निकालाचे कवित्व अद्याप सुरू आहे. ग्रंथालय भूषणच्या उमेदवारानंतर ग्रंथमित्र पॅनलनेही निकालावर आक्षेप घेतला आहे. सहा हजार ५८० गहाळ मतांचा हिशेब न लागणे, ही गंभीर बाब असून या मतपत्रिका गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दोनही पॅनलच्या आक्षेपांवर मंगळवारी निर्णय जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘सावाना’ निकालाच्या वेळी मतदानाच्या जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवर विजयी पॅनलच्या राजेंद्र जाधव या उमेदवाराने आक्षेप घेत गहाळ मतांचा हिशेब निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. शंकर सोनवणे यांच्याकडे मांडला. यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी संशयास्पद वातावरण निर्माण झाले असल्याचे ग्रंथमित्र पॅनलचे श्रीकांत बेणी यांनी नमूद केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असतानाही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर ग्रंथमित्रचे अध्यक्षपदाचे उमेदवार वसंत खैरनार यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय घोषित करण्याअगोदरच विरोधकांनी मतमोजणीच्या ठिकाणी घातलेला गदारोळदेखील या पार्श्वभूमीवर संशयास्पद वाटत आहे. कार्यकारी मंडळ सदस्य सभादांकरिता मतमोजणीवेळी दोन्ही पॅनलचे प्रतिनिधी देवदत्त जोशी आणि अरुण नेवासकर यांनी बाद ठरवलेल्या मतांची तपासणी करून त्यापैकी १२ मते वैध ठरविली होती. मात्र निवडणूक अधिकारी सोनवणे यांनी मतमोजणीचा अंतिम आकडा जाहीर करतांना बाद मते ३४२ असल्याचे जाहीर करत स्वत: दिलेला निर्णय फिरवला होता.
मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेसाठी विक्रीकर विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी येणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात ग्रंथालय भूषण या विरोधी पॅनलच्या उमेदवारांशी संबंधित संस्थांचे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेकरिता राबविण्यात आल्याचे ग्रंथमित्रने म्हटले आहे. बहुसंख्य कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचा अनुभव नव्हता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बनावट मतदान झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजेंद्र जाधव यांच्या तक्रारीचा योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी ग्रंथमित्रच्या वतीने करण्यात आली आहे.
४३८ मतपत्रिकांचा हिशेब नाही?
‘सावाना’ निवडणुकीसाठी तीन हजार ९०५ मतदान झाले झाले. त्यात ३४२ मते बाद झाली. मतमोजणीस पात्र मते ही तीन हजार ५६३ होती. प्रत्येकी १५ मते १५ उमेदवारांना याप्रमाणे ५३,४४५. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीरपणे हिशेब दिलेली मते ४६.८६५ तर हिशेब न मिळालेली, गहाळ मते सहा हजार ५८०. याचा अर्थ ४३८ मतपत्रिकांचा हिशेब लागत नाही. या मतपत्रिका गेल्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रंथमित्र पॅनलच्या मागण्या
ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार शंकर बोऱ्हाडे यांनी ‘सावाना’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारी सदस्य पदांसाठी झालेल्या मतदानाचा तपशील मागितला आहे.x याबाबत निवडणूक अधिकारी सोनवणे यांच्याकडे त्यांनी अर्ज केला. तसेच बेणी यांनी ‘सावाना’ निवडणुकीच्या बंदिस्त मतपेटय़ा तसेच मतदान, मतमोजणी प्रक्रिया काळातील सीसीटीव्ही चित्रीकरण संग्रहित ठेवावे, अशी सूचना केली आहे.
सावाना निवडणूक निकालानंतर जे आक्षेप घेण्यात आले, त्याची माहिती मागविण्यात आली. त्याचा अभ्यास करून मंगळवारी निकाल जाहीर करण्यात येईल.-ॲड. शंकर सोनवणे, (निवडणूक निर्णय अधिकारी)
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2022 रोजी प्रकाशित
ग्रंथमित्र पॅनलचाही आक्षेप ;‘सावाना’ निवडणूक निकालाचे कवित्व सुरूच
सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी निकालाचे कवित्व अद्याप सुरू आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-05-2022 at 23:35 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Granthmitra panel savannah election result poetry continues amy