लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुटख्याची होणारी वाहतूक आणि विक्री करण्यासाठी होणारे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले. दोन्ही घटनांमध्ये एकूण २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक शहर स्थानिक गुन्हे शाखेच्या विभाग एकला पेठरोड येथील मोती सुपर मार्केटसमोर गुटखा विक्री होणार असल्याची माहिती मिळली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. संशयित मालवाहतूक वाहन येताच ते थांबविण्यात आले. चालक आणि सहचालकाने अमोल इंगुळकर (३७, रा. भोर) आणि जाबीर बागवान (रा.सातारा) अशी आपली नावे सांगितली. मालवाहतूक वाहनाची तपासणी केली असता वाहनात १८ लाख ५७ हजार १२० रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी मालवाहतूक वाहनही ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ३० लाख सात हजार १२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. संशयितांविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

दुसऱ्या घटनेत, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मद्याचा होणारा वापर पाहता जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांतून गुटख्यासह मद्याची तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या वतीने कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेला वणी-सापुतारा रस्त्यावरील पिंपरी फाटा परिसरात काही संशयित हे एका वाहनातून अवैधरित्या गुटख्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत पिंपरी फाटा परिसरात पाठलाग करुन वाहन अडवले. संशयित नवाज शेख (५०), मकसूद सय्यद (३७, रा. वणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख, ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.