एचएएल व रशियन रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनमध्ये करार
कालबाह्य लष्करी सामग्रीमुळे अपघाताच्या फेऱ्यात सापडलेल्या भारतीय लष्कराकडील चिता व चेतक हेलिकॉप्टरची जागा आगामी काळात रशियन बनावटीचे अत्याधुनिक ‘कामोव्ह २२६ टी’ हेलिकॉप्टर घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सुखोई लढाऊ विमानाच्या धर्तीवर वजनाने हलकी असणारे हे हेलिकॉप्टर ‘मेक इन इंडिया’ अभियानातंर्गत देशातच उत्पादीत केले जाणार आहे. जुनाट चिता व चेतक हेलिकॉप्टर तातडीने बदलावीत, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
लष्कराच्या हवाई दलाकडील चिता व चेतकचे वर्षांगणिक दोन ते तीन अपघात होत आहेत. त्यात वैमानिकांसह अधिकाऱ्यांना आजवर प्राण गमवावे लागले. ही दोन्ही हेलिकॉप्टर ३५ ते ४० वर्ष जुनी आहेत. त्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे.
नवीन खरेदी होत नसल्यामुळे त्यांचा वापर करणे भाग पडले. सीमावर्ती भागात दळणवळण, पुरवठा व्यवस्था व टेहेळणी आदी जबाबदारी सांभाळणाऱ्या या विभागाकडे ‘कामोव्ह २२६ टी’ च्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण हेलिकॉप्टर समाविष्ट होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडेच झालेल्या रशिया दौऱ्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले. रशियन रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात त्याबाबतचा करार करण्यात आला. चिता व चेतकचा संपूर्ण ताफा बदलण्यासाठी प्रारंभी २०० कामोव्ह हेलिकॉप्टरचे उत्पादन केले जाणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास ही संख्या वाढवली जाईल. एचएएलकडे ‘ध्रुव’ या देशी बनावटीच्या हेलिकॉप्टर निर्मितीचा अनुभव आहे. रशियन बनावटीच्या सुखोई लढाऊ विमानाची बांधणी ‘तंत्रज्ञान हस्तांतरण’ कराराद्वारे एचएएल करत आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियानातंर्गत या हेलिकॉप्टरचे देशात उत्पादन, देखभाल व दुरुस्ती यावर एकमत झाले.
वजनाने हलके असणारे कामोव्ह हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या गरजा पूर्ण करण्याच्या कसोटीला उतरले आहे. आधुनिक दिशादर्शक यंत्रणा, संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा आदींचा त्यात अंतर्भाव आहे. विशेष रचनेमुळे अतिशय कमी जागा उपलब्ध असणाऱ्या तळावरही त्याचा वापर करता येईल. त्याचा आवाजही इतर हेलिकॉप्टरच्या तुलनेत कमी आहे. या निर्णयाचे लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाने स्वागत केले. लष्कराच्या हवाई दलातील वैमानिक व अभियंत्यांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याचे या गटाच्या संस्थापिका अॅड. मिनल भोसले-वाघ यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी या गटाने संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन कालबाह्य हेलिकॉप्टरचा विषय मांडला होता. कामोव्ह हेलिकॉप्टर प्रमाणे ज्या कालबाह्य सामग्रीमुळे अधिकारी व जवानांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्या बदलण्याचा गांभिर्याने विचार करावा, असे या गटाने म्हटले आहे.