नाशिक : ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकामुळे अखिल नाटय़सृष्टीला वेगळा आयाम देणारे दिवंगत ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या आठवणींना सोमवारी गोखले शिक्षण संस्थेच्या प्रि.टी.ए. कुलकर्णी सभागृहात उजाळा देण्यात आला. निमित्त होते प्रा. वसंत कानेटकर जन्मशताब्दी समारोप सोहळय़ाचे आणि ज्या महाविद्यालयात त्यांनी २७ वर्षे प्राध्यापकी केली त्या हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवी शुभारंभ सोहळय़ाचे.

 मनमोहक रांगोळी, वसंतात फुललेल्या फुलांची आरास, नाटय़गीत, अभिवाचन, चित्रफीत, मनोगत अशा विविधांगी माध्यमांतून प्रा. कानेटकर यांच्या नाटय़, साहित्य आणि प्राध्यापकी सेवेचा मान्यवरांनी गौरव केला. महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी कानेटकर या ठिकाणी अवतरले असल्याने त्यांना उभे राहून मानवंदना द्यावी, असे आवाहन करताच उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली.

डॉ. गोसावी यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास उलगडला. अनेक अडचणींवर मात करून हे महाविद्यालय उभे राहिल्याचे त्यांनी नमूद केले. सोसायटीच्या प्रांगणात लवकरच शंभर खाटांचे रुग्णालय उभे राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले लेखक डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर यांच्यातील संबंध उलगडला. कुसुमाग्रजांचा विशाखा काव्यसंग्रह कानेटकर शिकवत असत. त्यांना सर्व कविता मुखोद्गत होत्या. विशाखाचे सर्वप्रथम वाचन कानेटकरांनी केले होते, असे त्यांनी सांगितले. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही विषयांचे अध्यापन करताना त्यांनी कधीही पुस्तक हाती घेतले नाही, असे त्यांनी नमूद केले.

वसंत कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर यांनी कानेटकर लेखन करण्यासाठी सतत वाचन, चिंतन, मनन करीत असे सांगितले. त्यांना झोपून लिहिण्याची सवय होती, असे नमूद केले. नवीन पिढीवर त्यांची नाटके प्रभाव पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे यांनी लहानपणीच्या आठवणी सांगितल्या.

कानेटकरांना एकांतात राहणे आवडायचे, पण त्यांच्या बंगल्यासमोर चिंचेचे झाड असल्याने चिंचा पाडण्यासाठी दगड मारून कानेटकरांचा एकांतवास भंग केल्याची आठवण डॉ. देशपांडे यांनी सांगितली. नंतर त्यांच्या घरी हक्काने येणे-जाणे सुरू झाले तेव्हा त्यांच्या पत्नी सिंधुताईंनी घरातल्यासारखी वागणूक दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. कानेटकरांच्या विद्यार्थिनी हिरा कुलकर्णी यांनी मनोगतात गोखले एज्युकेशन सोसायटीशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.

चित्रकार धनंजय गोवर्धने यांनीही मनोगत व्यक्त केले.  या विद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवाची पाश्र्वभूमी विशद करून मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रणव रत्नपारखी यांनी केले. याप्रसंगी सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, विश्वस्त आर. पी. देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, कल्पेश गोसावी आदी उपस्थित होते. श्रुतिका पाठकने मत्स्यगंधा नाटकातील ‘तू तर चाफेकळी’ हे गीत सादर केले. शुभम धांडेने ‘वेडय़ाचे घर’ या नाटकांतील प्रवेश सादर करताना दामूची व्यथा मांडली.

कानेटकरांचे नातू अंशुमान, वासुदेव दशपुत्रे, श्रुजा प्रभूदेसाई, प्रतिमा कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले. वृन्दा भार्गवे आणि मार्मिक गोडसे यांनी चित्रफितीतून कानेटकर यांचा नाटय़, कथा, कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडला. माजी विद्यार्थी हिरा कुलकर्णी, धनंजय गोवर्धने, कवी नरेश महाजन, डॉ. उद्धव अष्टूरकर, पत्रकार प्रशांत भरवीरकर यांचा सत्कार करण्यात आला.