नाशिक : उत्तर भारतात श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने उत्तर भारतीयांनी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. ऊन-पावसाचा आनंद घेत भाविक दर्शन रांगेत उभे राहिले. रांगेत अधिक वेळ गेल्याने काही वादाचे प्रसंग उद्भवले. भाविकांच्या गर्दीमुळे देवस्थानचे नियोजन कोलमडले.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे उत्तर भारतीयांनी श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त दर्शनासाठी गर्दी केली. शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवस आणि श्रावणी सोमवार यामुळे तीनही दिवस देवस्थान परिसरात भाविक, पर्यटकांची गर्दी कायम राहिली. भाविकांच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगांमुळे मोफत धर्मदर्शनाची व्यवस्था करण्यात आली. यानुसार पूर्व दरवाजा- जुने महादेव मंदिर पूल- स्मशानभूमी रोड पूल- नारायण नागबळी धर्मशाळा-मंदिर ट्रस्टचे मुख्य वातानुकूलित मंडपमार्गे नंदी मंदिर आणि मुख्य मंदिरात जाता येत होते.

ज्या ठिकाणी मंडप खुला होता, तेथे भाविकांसाठी कुठल्याही सुविधा नव्हत्या. सततच्या पावसामुळे याठिकाणी दुर्गंधी येत राहिल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमीसमोरून दर्शन रांग जात होती. भाविकांना दर्शनासाठी रांगेतच पाच ते सहा तास ताटकळत राहावे लागले. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांसाठीही दर्शन रांग होती. त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाजवळ रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्याने कोणती दर्शन रांग खरी, असा प्रश्न भाविकांना पडला. मंदिर जवळ आल्यावर रांगेतील भाविकांनी गोंधळ केल्याने काही काळ वादाचे प्रसंग उद्भवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारणत: दोन दिवसांत सव्वा लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. परंतु, भाविकांना या काळात वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. देवस्थानचे नियोजन साफ कोलमडले. सोमवारी अधूनमधून पाऊस येत असतानाही भाविकांनी दर्शनरांग सोडली नाही. दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्या भाविकांना पावसामुळे वाहनतळ, बस स्थानक वा अन्य ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा तसेच इतर खासगी वाहनचालकांचा जादा भाड्याचा त्रास सहन करावा लागला. काहींनी देवदर्शनानंतर त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रती केदारनाथ, प्रती शेगाव, अंबोली घाट, हरसूल घाट या भागांना भेट दिली.