नाशिक : सिन्नर शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग शिवशाही बसवर कोसळल्याने नुकसान झाले. बसमध्ये यावेळी प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली.
सिन्नर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. दोन तास पाऊस सुरु होता. या पावसात सिन्नर बस स्थानकाचा मागील भाग कोसळला. या ठिकाणी उभ्या असलेल्या शिवशाहीचे त्यामुळे मोठे नुकसान झाले. स्थानकाचे छत तसेच दर्शनी भाग कोसळल्याने ठिकठिकाणी मातीचा ढिगारा तसेच अन्य सामान अस्ताव्यस्त पसरले. यामुळे काही काळासाठी स्थानकातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती.
२०१३ मध्ये आमदार माणिक कोकाटे यांनी बीओटी तत्वावर बस स्थानकाचा कायापालट केला होता. स्थानकात वायफाय सुविधेसह इतर अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या होत्या. परंतु, काही महिन्यातच या सेवा बंद पडल्या. सजावटीसाठी करण्यात आलेला देखावा पावसात फोल ठरला. अनेक ठिकाणी छताला गळती लागली आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. याविषयी विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी, स्थानकाचा काही भाग कोसळल्याने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले.