नाशिक : काँग्रेसमध्ये ३५ वर्षे काढलेल्या महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या डाॅ. हेमलता पाटील यांनी तीन महिने कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभाग घेण्याचे टाळल्यानंतर अखेर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीला (अजित पवार) जवळ केले. काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार) असा राजकीय फेरफटका डाॅ. पाटील यांनी मारला आहे. आता मात्र त्यांनी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

१९९६ पासून नगरसेविका म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या डाॅ. हेमलता पाटील या काँग्रेसनिष्ठ म्हणूनच ओळखल्या जात. काँग्रेसमध्ये राहूनच त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदही भूषविले होते. काँग्रेसमध्ये गटबाजी असतानाही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या सहभागी होत असत. त्यामुळेच डाॅ. पाटील या भविष्यात काँग्रेसचा त्याग करतील, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. परंतु, तसे घडले खरे. त्यास कारणीभूत ठरली २०२४ ची विधानसभा निवडणूक. विधानसभा निवडणुकीत हेमलता पाटील यांनी महाविकास आघाडीकडून नाशिक मध्य मतदारसंघातून काँग्रेससाठी उमेदवारी मागितली. परंतु, महाविकास आघाडीतील जागा वाटपात नाशिक मध्य मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने पाटील या नाराज झाल्या. नाशिक मध्य मतदारसंघात बंडखोरी करण्यापासून स्वत:ला रोखत त्या प्रचारापासून दूर राहिल्या. काँग्रेस प्रवक्तेपदासह सर्व पदांचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडल्या.

काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांवर त्यावेळी पाटील यांनी गंभीर आरोप केले होते. विधानसभा निवडणुकीत आपणास उमेदवारी मिळवू न देता काँग्रेस नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेवर असतानाही नाशिक मध्य मतदारसंघात आपणास चांगले वातावरण होते. नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसने न घेणे हा घातपात होता. या पक्षात आपणास पुढे भविष्य नसल्याचे लक्षात आल्याने काँग्रेस सोडल्याचे त्यांनी नमूद केले होते.

काँग्रेस सोडलेल्या पाटील यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ३५ वर्षे काढलेल्या हेमलता पाटील यांना शिंदे गटातील कार्यपध्दती अंगिकारणे अवघडच होते. शिंदे गटात असलेले गट पाहून कोणत्याही एका गटात मन रमवण्यापेक्षा अवघ्या दीड-दोन महिन्यात त्यांनी पक्षच सोडला. शिवसेनेची काम करण्याची पध्दत आणि गटबाजी रुचली नसल्याने त्यांनी शिवसेना सोडली. या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नसल्याची आपली प्रामाणिक भावना झाल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा हेमलता पाटील यांनी सांगितले होते.

शिंदे गटातून बाहेर पडल्यानंतर तीन महिने हेमलता पाटील या कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या नाहीत. परंतु, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पुढील राजकीय प्रवासासाठी राष्ट्रवादीची (अजित पवार) निवड केली. मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. अजित पवार गटात मिळेल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.