नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासनाकडून वेग आला असताना या कामांचा आता शेतकऱ्यांना त्रास होऊ लागला आहे. एकिकडे, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी घरे, दुकाने, शेतजमीन काढण्याची तयारी असताना इगतपुरी तालुक्यातील घोटी ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० चौपदरीकरण करण्यात येणार आहे. घोटी-त्र्यंबकेश्रर महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी इगतपुरी तालुका कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.

इगतपुरी तालुका कृती समितीच्या वतीने महिन्याभरापासून शासकीय ठिकाणी घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन करु नये म्हणून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने कृती समितीच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधारी महायुतीला त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता आहे.

भूसंपादनावर शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर कुठलाही विचार न करता, शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यावेळी स्थानिक राजकीय पदाधिकारी यांनी भेटी देऊन साखळी उपोषणाला पाठींबा दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील जमिनी शासनाने याआधीच विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्याने तालुक्यातील शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यात आता शासनाने सिंहस्थ कुंभमेळा कामांच्या नियोजनात घोटी – त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी पुन्हा भूसंपादन प्रक्रिया शासन स्तरावर सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

इगतपुरी तालुका कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, सचिव गोरख वाजे, सल्लागार सदस्य अरुण पोरजे, उपाध्यक्ष सपन परदेशी, विवेक कुटके, सहसचिव ॲड. भरत कोकणे, सल्लागार उमेश खातळे आदींसह प्रकल्पग्रस्त गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, भूसंपादन अधिकारी रवींद्र भारती, नायब तहसीलदार धनंजय लचके, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी संतोष अहिरे, पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या वतीने उपोषण ठिकाणी भेटी देण्यात आल्या. मात्र प्रकल्पबाधित शेतकरी भूमिकेवर ठाण आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उदय जाधव, भाजपचे भास्कर गुंजाळ, उत्तम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस उमेश खातळे, दिलीप चौधरी, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ, किसन शिंदे, रामचंद्र गायकर, विश्वास खातले, ज्ञानेश्वर खातले यांच्यासह आहुर्ली परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट देत शेतकऱ्यांच्य आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

इगतपुरी तालुक्यातील सातत्याने विविध प्रकल्पासाठी जमिनी संपादित होत आहेत. आता घोटी – त्रंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार असल्यामुळे व्यावसायिक व शेतकरी भूमीहीन होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून हे भूसंपादन थांबवावे. -नागेश गायकर ( अध्यक्ष, शेतकरी कृती समिती)