नाशिक – घरगुती सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरणाऱ्या नाशिकरोड भागातील अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून ६३ सिलिंडर, तीन वजन काटे आणि तीन यंत्र असा एकूण दोन लाख ११ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने केली.

नाशिकरोडच्या भारती मठालगत पाटील गॅरेजच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळाली. याआधारे गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी आदींच्या पथकाने पाटील गॅरेजच्या मागील संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी संशयित शिवा लोणारे (२०, राजवाडा, मालधक्का रोड, नाशिकरोड), शाकीर शहा (२५) आणि नवाझ शहा (२१, दोघेही सुंदरनगर, झोपडपट्टी, देवळाली गाव) हे भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलिंडरमधून खासगी वाहनात यंत्राद्वारे गॅस भरताना आढळले. त्यांच्याकडे ६३ गॅस सिलिंडर, तीन मोटारी आणि वजनकाटे, रोख रक्कम असा एकूण दोन लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत हवालदार प्रकाश बोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन संशयितांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखे्चे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली.