वनविभाग वन्य जीव संरक्षणासाठी प्रयत्नशील असून दुर्मिळ प्रजातीच्या प्राणी-पक्ष्यांच्या जतनासाठी काम करत आहे. नाशिक वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भारतीय प्रजातीतील कासवाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक केली आहे. या कारवाईत वनविभागाने दुर्मिळ असे इंडियन टेन्ट टर्टल कासव जप्त केले आहे. या कासवाची अवैध्यरित्या विक्री करण्यात येत होती. या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- मालेगावमध्ये ओला दुष्काळ आढावा बैठक; शेतकऱ्यांकडून विमा कंपन्यांविरोधात तक्रारींचा पाऊस

एकास अटक

दुर्मिळ कासवाची विक्री होणार असल्याची माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महामार्ग बस स्थानक समोरील बुरहानी फिश ॲक्वेरिअम दुकानाची झडती घेतली. या झडतीत इंडियन टेन्ट टर्टल कासव जप्त करण्यात आले. या प्रकरणी वनविभागाच्या पथकाने खोजेमा असगरअली तिन्वा नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तिन्वा याने कासव भारतीय अधिनियम अंतर्गत समाविष्ट व संरक्षित असलेले कासव विकण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात समोर आले आहे.