धुळे – जिल्ह्यातील दोन आश्रमशाळांमध्ये आठवडाभरात दोन विद्यार्थिनींंचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणात विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे आश्रमशाळांमधील कारभार पुन्हा ऐरणीवर आला आहे. साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील केंद्रीय शाळेतील एका १२ वर्षे वयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटनां ताजी असतांना गुरुवारी देवळीपाडा (ता.साक्री) येथील श्रीसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनुदानित आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षे वयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या विद्यार्थिनीच्या मृत्युचे कारण समजलेले नाही
आश्रमशाळांमधील व्यवस्थापन कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असते. मंजुळा पवार (नऊ वर्षे) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याआधी मंगळवारी गणेशपूर केंद्र शाळेतील सोनाली पावरा (१२, रा.खरवड, धडगाव) हिचा मृत्यू झाला. देवळीपाडा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आजाराची लागण झाल्याचे म्हटले जात असून याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती दोन दिवसापासून बिघडली असल्याचे म्हटले जाते.
मंजुळा पवार ही जेवण करून शाळेत झोपल्यानंतर तिला बरे वाटत नसल्याने पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंजुळाचा मृतदेह धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आले. मंजुळाचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याच आश्रमशाळेत मंजुळाची मोठी बहीणही आहे. तीही काही दिवसांपासून आजारी होती, असे सांगितले जाते.
गणेशपूर (ता.साक्री) येथील केंद्रीय शाळेतील मृत सोनाली पावरा या विद्यार्थिनीला एक दिवस ताप आला, तीने आठ सप्टेंबरला परीक्षाही दिली आणि नऊ सप्टेंबरला रात्री ही घटना घडली अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली.दरम्यान, अन्य २० ते २५ विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक नसल्याने आवश्यक औषधे देऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. – डॉ. सचिन बोडके (जिल्हा आरोग्य अधिकारी,धुळे)
अनुदानित आश्रम शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना कुठल्याही साथीच्या आजाराची लागण झालेली नाही. मंजुळा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना कशामुळे घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.यासाठी चौकशी समिती घटनास्थळी भेट देईल आणि वस्तुस्थिती जाणून घेईल. – मनोज पाटील (सहायक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प विभाग)