जळगाव – दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतरही प्रतिभा शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी काहीच उल्लेख केला नव्हता. मात्र, आता त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्यास जिल्हास्तरापासून राज्यस्तरावरील सगळेच लोक कारणीभूत असल्याचे खळबळजनक वक्तव्य शिंदे यांनी केले आहे.

जळगावमध्ये एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिभा शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याची कारणीमिमांसा करताना काँग्रेसमधील राज्याच्या धुरिणांवर जोरदार टीका केली. दोन वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या आशा घेऊन मी गेले होते, जे प्रश्न सोडविण्याची मला अपेक्षा होती, त्या संदर्भात मला तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मला राहुल गांधींनी प्रचंड सहकार्य केले. आणि त्यांची कायम मी आभारी राहील. ते खूप चांगले नेते आहेत. त्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. जिल्हास्तरापासून राज्यापर्यंत वेगवेगळे पर्याय देऊन काम करणारी व्यक्ती मी घरी बसू शकत नाही. परंतु, मला काँग्रेसच्या बैठकीला न बोलविण्यापासून न बोलू देण्यापर्यंतचे राजकारण केले गेले. त्यातून मला जाणवले की, माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांचे प्रश्न कसे सुटतील. मग ते वन जमिनीचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे की महिलांचे. ते सर्व प्रश्न मला सोडवायचे होते. पण त्याचे उत्तर काही मला काँग्रेसमध्ये मिळताना दिसले नाही. म्हणून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा आपण निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाल्या.

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना छोटी माणसे संबोधून माझी जी काही नाराजी आहे, ती राज्य पातळीवर असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी नमूद केले. प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यावर मी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे गेले. वडेट्टीवारांना आणि चेन्नीथलांना भेटले. मुकुल वासनिकांना तब्बल ३० वेळा फोन आणि मॅसेज केले. शेवटी मी २३ जुनला राहुल गांधींची भेट घेतली. त्यांना मी सांगूनच आले होते, की मला काँग्रेसमध्ये काम करणे आता शक्य नाही. माझा आवाज दाबला जात आहे आणि मी आवाज दाबू देणाऱ्यांमधील नाही. जिथे काम करू दिले जात नाही तिथे मी राहू शकत नाही, असे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले.

आपण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले. अजित पवार यांनी आमचे सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे. आम्ही त्यांच्यासमोर खान्देशचा खूप मोठा अनुशेष असल्याचाही मुद्दा मांडला आहे. सर्व विभागांसाठी स्वतंत्र महामंडळे आहेत. पण उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ नाही. खान्देशला पश्चिम महाराष्ट्रात ढकलले जाते आणि त्यामुळे विकासाचा मोठा असमतोल दिसून येतो. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण अजित पवार गटात रविवारी जळगावमधील मेळाव्यात प्रवेश करणार आहोत. लोकसंघर्ष मोर्चाचे किमान २५ हजार कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.