जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी प्यायल्याने २९ मुलांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तत्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पारोळा येथील गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना तत्काळ सूचना दिल्या. घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी गावात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्य प्रदेशातून शेतमजुरीसाठी काही मजूर आले आहेत. शेतमजुरांच्या २९ मुलांना शेतातील पिंपातील अनेक दिवसांपासून साचलेले पाणी प्यायल्याने विषबाधा झाली असावी, असा अंदाज आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

हेही वाचा : निर्यात बंदीमुळे कांदा गडगडला; लिलाव बेमुदत बंद, चांदवडमध्ये आंदोलकांवर लाठीमार 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ पैकी दोघांवर तामसवाडी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकार्‍यांसह गटविकास अधिकार्‍यांकडून कुटीर रुग्णालयात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. गावातील पाणी नमुने आरोग्यसेवकांनी घेतले आहेत. आमदार चिमणराव पाटील यांनीही रुग्णालयात धाव घेत रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.