जळगाव : राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच गुजरातमधून दुचाकी लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून सुमारे सव्वातीन लाखांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संतोष ऊर्फ शेरा इंगोले (रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव जहाँगीर, वाशिम) असे संशयिताचे नाव आहे. यापूर्वी जिल्ह्यातील चौघा संशयितांना अटक झाली आहे.

राज्यातील बुलडाणा, वाशिम, अकोला आदी जिल्ह्यांसह गुजरातमधून दुचाकी लांबवून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. यात ३० ऑगस्टला सुनील भिल (रा. पिंप्री, ता. एरंडोल), खुशाल ऊर्फ भय्या पाटील, गोविंदा कोळी (दोन्ही रा. नागदुली, ता. एरंडोल) आणि हर्षल राजपूत (रा. मोहाडी, ता. पाचोरा) या संशयितांना चोरीच्या १६ दुचाकींसह अटक केली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष इंगोले हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.

हेही वाचा : धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस प्रबळ, मनपा निवडणुकीत मविआ एकत्र; कुणाल पाटील यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी इंगोले हा जळगाव शहरात दुचाकी विकण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शहरातील अजिंठा चौफुली परिसरात सापळा रचत संशयित इंगोलेच्या मुसक्या आवळल्या. त्याने दुचाकी लांबविल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या सुमारे तीन लाख २० हजारांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या. यापूर्वी १६ आणि आता आठ, अशा २४ दुचाकी टोळीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी संशयित इंगोलेला जामनेर येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.