नाशिक – अवकाळी पाऊस, गारपीट, खराब हवामानामुळे आता चाळीत साठवणूक केलेला कांदा सडत असल्याने शेतकरी नव्या संकटात सापडला आहे. कांदा खराब होऊ लागल्याने लागवडीवरील खर्चही भरून निघणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे. काही ठिकाणी कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत.

कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा लागवड केल्यापासून एका पाठोपाठ एक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे नुकसान झाले होते. उन्हाळ कांद्याला सहा ते सात महिन्यांचे आयुर्मान असते. चाळीत साठवून योग्य भाव असेल, तेव्हा बाजारात नेता येतो. त्यामुळे अनेक शेतकरी चाळीत त्याची साठवणूक करतात. यंदा कळवण तालुक्यात चाळीत ठेवलेला कांदा अवघ्या १५ दिवसांत सडत आहे. काही ठिकाणी चाळीतील सर्वच कांदा खराब झाला. त्यामुळे तो जिथे जागा मिळेल, तिथे फेकला जात आहे. अवकाळी पावसाने रब्बी हंगामात गव्हापासून ते उन्हाळी कांदा काढणीपर्यंत धुमाकूळ घालून मोठे नुकसान केले आहे. सततच्या पावसाने संपूर्ण रब्बी हंगाम हातातून गेला. गारा व वादळी वाऱ्यात पावसात शेतातील उभी पिके आडवी झाली. आता हे नवीन संकट उभे ठाकले आहे.

हेही वाचा – धुळे तालुक्यात बनावट दारु अड्डा उदध्वस्त

पंधरवड्यापूर्वी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवणूक केली होती. अवकाळी पावसाचे पाणी उन्हाळी कांद्याच्या पातीत गेल्याने कांदा देठापासून सडण्यास सुरुवात झाली. भाव नसल्याने उन्हाळी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्याचा कल वाढला होता. मात्र लाखो रुपये खर्च करून चाळीत साठविलेला कांदा खराब होऊ लागला आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली की भाव वाढतील, या आशेवर ते होते. मात्र मार्च, एप्रिलमधील पाऊस उन्हाळी कांद्यासाठी त्रासदायक ठरला आहे. चाळीतील साठवलेला कांदा डोळ्यांदेखत फेकला जात आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही भरपाई मिळालेली नाही. आता तोच कांदा सडत आहे. शासनाने तात्काळ उपाय करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे.


कळवण तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगाम असे १९१८ हेक्टर कांद्याचे रोपवाटिका क्षेत्र असून लेट खरीप लागवड ६६० हेक्टर क्षेत्र आहे. जानेवारीच्या अखेर आणि फेबुवारीच्या पहिल्या सप्ताहात रब्बी,उन्हाळी हंगामात २२४७ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड झाली. फेबुवारीच्या दुसऱ्या सप्ताहात ३८६२ हेक्टर लागवड झाली. तालुक्यात एकूण २६,७६९ हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाली आहे.

हेही वाचा – कनिष्ठ सहायकाची हिंमत बघा, शाखा अभियंत्याकडून लाच घेतली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतातून काढलेला कांदा १५ दिवसांत सडला. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी कांद्याच्या गाभ्यात शिरले. कांदा काढणीनंतर टिकेल असे वाटले होते. पण तो लगेच सडला. कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. – बाळासाहेब पाटील, शेतकरी, असोली