नाशिक : औद्योगिक वसाहती, पर्यटन स्थळ, धार्मिक तीर्थक्षेत्र आणि शहरी असा तुलनेत सधन भाग सामावणाऱ्या नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात वीज पुरवठा करण्यास टाटा पॉवर या खासगी वीज कंपनीने स्वारस्य दाखविले आहे. या भागात वीज वितरण परवाना मिळावा, याकरिता कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अर्ज सादर केला आहे.
महावितरणला ज्या तालुक्यातून अधिक महसूल प्राप्त होतो, ते हे भाग असल्याचे सांगितले जाते. या संदर्भात टाटा पॉवर कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली असून ३० दिवसांच्या आत त्यावर आक्षेप व हरकती मागविल्या आहेत. सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात महावितरण कंपनी वीज पुरवठा करते. महावितरणचे सुमारे १६ लाख ग्राहक आहेत. यामध्ये सहा लाख कृषीपंपधारकांचा समावेश आहे. नाशिक शहरातील ग्राहकांची संख्या पाच लाख असल्याचा अंदाज वर्तविला जातो. नाशिकमध्ये सातपूर, अंबड, सिन्नरमध्ये माळेगाव, इगतपुरी, गोंदे अशा औद्योगिक वसाहती असून औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक आहे. इगतपुरी हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द तर, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये वीज पुरवठा करण्यास टाटा पॉवरने रुची दाखविली आहे.
टाटा समूहातील टाटा पॉवर ही कंपनी आहे. तिच्याकडून सध्या मुंबईसह अन्य काही भागात वीज पुरवठा केला जातो. कंपनीने नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या क्षेत्रासाठी वितरण परवाना मागितला आहे. कंपनीचा अर्ज वीज नियामक आयोगाने स्वीकारल्यानंतर सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करीत हरकती वा आक्षेप मागविण्यात आले आहेत. प्रस्तावित वीज पुरवठा क्षेत्रात नाशिक महानगरपालिकास, इगतपुरी, सिन्नर व त्र्यंबकेश्वर नगरपरिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अर्थात औद्योगिक वसाहत क्षेत्रांचा समावेश होतो. कंपनी मुंबईत ४८५ चौरस किलोमीटर परिसरात साडेसात लाखहून अधिक ग्राहकांचा आधार आहे.
कंपनीच्या इतर राज्यातील उपकंपन्यांची कामगिरी उल्लेघनीय आहे. एक शतकाहून अधिक काळ कंपनी वीज वितरणाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळे वाढत्या गुंतागुंतीच्या वीज वितरण व्यवसायाचे व्यवस्थापन कौशल्य असल्याकडे कंपनीने लक्ष वेधले आहे. या संदर्भात ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती वीज नियामक आयोगाकडे नोंदविता येतील, असे कंपनीने म्हटले आहे. हरकतींची मुदत संपल्यानंतर वीज नियामक आयोग टाटा पॉवरच्या अर्जावर काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महावितरणने वीज वितरणासाठी काही वर्षांपूर्वी दिलेल्या फ्रेंचायझी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मालेगावमध्ये खासगी वीज कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. परंतु, संबंधितांच्या सेवेवर ग्राहक समाधानी नाहीत. जळगावमध्येही या प्रकारे खासगी कंपनीकडे जबाबदारी दिली गेली होती. परंतु, नंतर ती पुन्हा महावितरणला स्वीकारावी लागली. अन्य काही भागात तशी स्थिती ओढावली. मालेगावध्ये वीज पुरवठ्यातील अनियमिततेवरून ग्राहकांमध्ये कमालीचा रोष आहे. यावरून वारंवार आंदोलने होतात.