नाशिक : प्रस्तावित वळण मार्ग अधिक विस्तारल्यास (आणखी बाहेरून नेल्यास) शहराचा विकास अधिक गतिमान होऊ शकतो. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वळण रस्त्याचा अभ्यास करत आहे. वळण रस्त्याचे दोन, तीन तात्पुरते संरेखन तयार झाले आहेत. या मार्गात संरक्षण विभागाच्या जागेचा अडसर आहे. त्याचा विचार करून मूळ प्रस्तावित वळण मार्गात अनेक फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी कुंभमेळ्यासाठी तयार केलेले प्राथमिक आराखडे सादर केले. महापालिकेच्या आराखड्यात शहराबाहेरून जाणाऱ्या दोन वळण रस्त्यांचा समावेश नसल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे यांनी विचारणा केली. महापालिकेने वळण रस्त्याचे प्रस्ताव आधीच शासनाकडे सादर केले आहेत. यातील एक वळण रस्ता एमएसआरडीसी तयार करणार आहे. याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली.
हेही वाचा : धुळे : विवाहासाठी मंडळी जमली अन् संकट उभे
प्रस्तावित मार्गाचे दोन, तीन तात्पुरते संरेखन तयार झाले आहेत. सध्याचा वळण रस्ता आणखी बाहेरून गेल्यास शहराचा विकास अधिक जलदगतीने होऊ शकतो. या मार्गात संरक्षण विभागाची जागा असून त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. त्या अनुषंगाने एमएसआरडीसी अभ्यास करून नियोजन करत असल्याचे भुसे यांनी सूचित केले. नाशिककरांच्या भविष्यासाठी जे संरेखन सोयीचे असेल, त्याचा विचार केला जाईल. नियोजनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष ॲप तयार करून त्यांच्या सूचना मागविल्या जाणार असल्याचे भुसे यांनी नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात स्थानिक अधिकाऱ्यांनी यापूर्वी कुंभमेळा झालेल्या स्थळांचा दौरा करून तेथील चांगल्या बाबींचा आपल्या आराखड्यात समावेश करावा, असेही सांगण्यात आले. त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये पाणीपट्टी थकबाकीदार, अनधिकृत नळ जोडणीविरोधात मोहीम
साधुग्रामसाठी ५०० एकर जागा प्रस्तावित
साधुग्रामसाठी ५०० एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. इतर ठिकाणी हे क्षेत्र फार मोठे आहे. ही जागा संपादित करण्यासाठी जादा चटईक्षेत्र देण्याचे मनपाने प्रस्तावित केले आहे. साधुग्रामची जागा केवळ वर्षभर सिंहस्थात वापरात असते. उर्वरित ११ वर्ष ही जागा तशीच पडून असते. या कालावधीत त्या जागेचा कसा वापर करता येईल, याचा विचार करण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत कांदा कळीचा मुद्दा
कुंभमेळ्याआधी सुरत-चेन्नई महामार्ग पूर्ण ?
सुरत-चेन्नई हरित मार्ग, समृध्दी महामार्ग आणि एमएसआरडीसीकडून पुणे-शिर्डी-नाशिक हे अंतर अडीच तासावर आणले जात आहे. या सर्वाचा विचार नाशिकचा वळण रस्ता प्रस्तावित करताना करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. कुंभमेळ्याआधी सुरत-चेन्नई मार्गाचे काम पूर्ण होऊ शकते. त्याचा नाशिकच्या विकासाला लाभ होईल. एमएलआरडीएने नाशिक-पुणे (शिर्डी मागे) हरित महामार्ग प्रस्तावित केला आहे. कु्ंभमेळ्याच्या आराखड्यात जिल्ह्यातील सप्तश्रृंग गड, चांदवड व अन्य देवस्थानांचाही समावेश केल्यास उपरोक्त ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करणे शक्य होईल, असेही भुसे यांनी नमूद केले आहे.