मालेगाव : विवाह समारंभांमध्ये आरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण केले जात असून येथील मराठा बहुजन प्रबोधन कृती विचार सभेने त्यास विरोध दर्शविला आहे. संस्थेच्या बैठकीत महाराजांची आरती, विवाहपूर्व सोहळे (प्री वेडिंग), हुंडा, लग्नात आवाजाच्या भिंतींचा वापर असे प्रकार थांबविण्याविषयी ठराव करण्यात आला. यासंदर्भात समाज प्रबोधन करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
सामाजिक पातळीवरील अनुचित प्रथांना पायबंद घालतानाच योग्य परंपरांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने येथे मराठा बहुजन प्रबोधन कृती विचार सभेची स्थापना करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, बांधकाम व्यावसायिक अजय बच्छाव, प्रा. के. एन. अहिरे, डॉ. यशवंत पाटील हे या संस्थेचे प्राथमिक निमंत्रक आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत, प्रत्येकाला त्यांचा आदर आणि अभिमान आहे. मात्र, त्यांची आरती करून त्यांना देवत्व प्रदान करण्याचा सुरू असलेला प्रयत्न चुकीचा असल्यावर बैठकीत एकमत झाले. विवाह समारंभांमध्ये महाराजांच्या आरतीऐवजी मूर्ती अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा, अशी सूचना मान्य करण्यात आली. विवाह होणाऱ्या कुटुंबांना विश्वासात घेऊन चर्चा करणे, साध्या पद्धतीने विवाह करणाऱ्यांचा गौरव करणे, यावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी प्रशांत पवार, कैलास सोनवणे, नितीन मगर, शेखर पवार, आर. डी. निकम आदी उपस्थित होते.
बैठकीत मंजूर ठराव
विवाहपूर्व सोहळा हा प्रकार बंद करावा अथवा किमान विवाहात त्याचे चित्रण दाखवू नये, लग्न वेळेवर लावावे, आवाजाच्या भिंतींऐवजी पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरावा, कर्ज काढून लग्नात खर्च करू नये, मद्यप्राशन करून नाचणाऱ्यांना पायबंद घालावा, पुष्पहार घालताना वर आणि वधुला उचलू नये, लग्नात केवळ वधु आणि वर यांच्या वडिलांनीच फेटे बांधावेत, पाहुण्यांचे सत्कार बंद करावेत, लग्न, वाढदिवस, उद्घाटन यासारख्या कार्यक्रमांमध्ये पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपातील आहेर करावेत, हुंडा पद्धत बंद करावी, वधु पित्याची इच्छाच असेल तर मुलीच्या नावावर बँकेत ठेव ठेवावी, लग्न, साखरपुडा आणि हळद हे कार्यक्रम शक्यतो एकाच दिवशी उरकावेत, वैदिक विवाह पद्धत बंद करावी, आदी ठराव बैठकीत करण्यात आले.