नाशिकमध्ये उपचार सुरू असलेले सर्वाधिक रुग्ण

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. बाजारपेठा तसेच दुकानांमध्ये सम-विषमच्या नियमाची अमलबजावणी होऊनही खरेदीसाठी झुंबड उडते. सुरक्षित अंतर राखण्याचा निकष पाळला जात नाही. व्यावसायिकांना गर्दी होऊ न देण्याचा विसर पडला आहे. ही स्थिती करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास हातभार लावत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्य़ात करोनाबाधितांच्या आकडेवारीने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्या जिल्ह्य़ात करोनाचे ६५२ रुग्ण उपचार घेत असून यात सर्वाधिक ४४५ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. २४ तासात एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३९ वर पोहचली आहे.

मंगळवारी दुपारी १२२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात नव्याने १८ रुग्ण आढळले. तर १०४ जणांचे अहवाल नकारात्मक आले. बाधितांमध्ये नाशिकरोड, जाधव मळा, मखमलाबाद, पेठ रोड येथील पाच जणांचा समावेश आहे. दोन दिवसांपासून शहराची रुग्ण संख्या अनुक्रमे ७५ आणि ६५ ने वाढली आहे. आतापर्यंत शहरात ७४२ रुग्ण आढळले. उपचारानंतर २५९ जणांना घरी सोडण्यात आले असून ४४५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये खोडेनगर येथील वृध्द, सातपूरच्या महादेववाडी येथील व्यक्ती, मुरूड गल्लीतील महिला, पारिजातनगर येथील व्यक्ती, वडाळा गावाील वृध्द, खडकाळी येथील व्यक्ती, नाईकवाडी पुरा येथील व्यक्तीचा समावेश असल्याचे पालिकेने म्हटले आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ११८ वर पोहचली आहे.

दीड महिन्यांपूर्वी मालेगावमध्ये करोनाचा वेगाने प्रसार झाला. तेथील स्थिती हळूहळू नियंत्रणात येत असतांना नाशिकमध्ये मात्र विपरित चित्र आहे.

र्निबध शिथील झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होत आहेत. बाजारपेठांमध्ये जिवनावश्यक वगळता अन्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी दुकानदारांना नियमावली घालून देण्यात आली आहे. परंतु, त्याचे ना ग्राहक पालन करतात, ना व्यापारी त्याचा आग्रह धरतात. सुरक्षित अंतर न राखता फिरणे, खरेदी केली जाते. काही जणांकडून मुखपट्टी परिधान केली जात नाही. महापालिकेकडून चाललेल्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळत नसल्याने प्रसार रोखण्यात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

रुग्णांची भटकंती का?

करोना रुग्णांवरील उपचारासाठी अधिग्रहीत केलेल्या सुदर्शन रुग्णालयातील दाखल रुग्ण, त्यंचे नातेवाईक इतरत्र जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून महापालिकेने या रुग्णालयास नोटीस बजावली आहे. रुग्णालयात तातडीने सुरक्षारक्षक नियुक्त करून दाखल असणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक रुग्णालय आणि परिसर सोडून इतरत्र जाणार नाही याची दक्षता घेण्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी बजावले आहे.