नाशिक : विविध कारणांनी मिळकत कराच्या थकबाकीचा डोंगर सुमारे ८०० कोटींवर पोहोचला आहे. यामध्ये ३२७ कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून एक सप्टेंबरपासून अभय योजना राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत एकरकमी मिळकत कराचा भरणा करणाऱ्यांना दंडात सवलत दिली जाईल. यामुळे महापालिकेला दंडाची कोट्यवधींची रक्कम सोडून द्यावी लागणार आहे.

शहरात मिळकतकराच्या थकबाकीची आकडेवारी वर्षागणिक वाढत आहे. मालमत्ता बंद असणे, मालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरणे, रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या मिळकती आदी कारणास्तव ही थकबाकी वाढत आहे. थकीत रकमेवर दोन टक्के दरमहा दंड लागू केला जातो. वर्षानुवर्षे मिळकतकराचा भरणा होत नसल्याने थकबाकीचे प्रमाण कमी झालेले नाही. सहा जुलै २०२५ अखेरपर्यंत मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम ७८३.३४ कोटी रुपये होती. यात ३२७.६४ कोटींच्या दंडाचा समावेश आहे.

पुढील काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणूका होत आहे. निवडणूक कामाची जबाबदारी कर आकारणी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ठ गाठण्यावर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, तातडीने उपाय म्हणून थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका अधिनियमान्वये अटकावणी अधिपत्र, मनपा वॉरंट शुल्क व नोटीस आदीत सवलत देण्यासाठी ही रक्कम वजा करून उर्वरित थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणाऱ्यांसाठी सवलत दिली जाणार आहे. अभय योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात फलक, रेडिओ, केबल नेटवर्क, प्रसारमाध्यमांमधील जाहिरातींवर ५० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. या रकमेची तरतूद करण्यात मनपाच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कालावधी, सवलती

एक सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत थकबाकीसह मिळकत कराची रक्कम भरणाऱ्यांना दंडावर ९५ टक्के सवलत दिली जाईल. एक ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळात थकबाकीसह मिळकत कर भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ८५ टक्के सवलती दिली जाईल. या सवलतीमुळे महापालिकेला २५० ते ३०० कोटींच्या रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे.