नाशिक – भारतीय जाती व्यवस्था संस्थात्मक पातळीवर असल्यामूळे बहुजनांना भ्रमित करण्यासाठी वेगवेगळे रूप धारण करीत आहेत. दक्षिणेत दर्जेदार लेखन होत आहे. युरोपियन देशांमध्ये असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे आपल्याकडे त्या स्वरुपाचे स्वातंत्र्य नाही. ‘असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा. सचिन गरुड यांनी केले.
येथे आयोजित पाचव्या नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलनात प्रा. गरुड यांनी मार्गदर्शन केले. मराठी भाषा मारण्यामागे एक मोठे षडयंत्र आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर होणारा खर्च कमी करून शिक्षणावर झाला पाहिजे. परंतु, याठिकाणी बी. डी. भालेकर शाळाही वाचू शकत नाही. अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगतिशील विचार प्रबोधनासाठी आवश्यक आहेत. या प्रबोधनाला भौतिक लढ्याची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगतिले. प्रास्ताविक प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे यांनी केले. जिल्हा सचिव प्रल्हाद पवार यांनी भूमिका मांडली.
स्वागताध्यक्ष डॉ. वंदना कावळे यांनी, लेखकाने समाज परिवर्तनाची कास धरली तरच प्रबोधनाची परंपरा पुढे जाईल, असे सांगितले. उद्घाटक ज्ञानेश्वर मोरे यांनी, साहित्याने सर्वांना सोबत घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. डॉ. विलास देशमुख, प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, राजू देसले, डॉ. मनिषा जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी साहित्यिक आणि सामाजिक योगदान देणाऱ्यांचा प्रगतिशील सन्मान सोहळा झाला. शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात ‘साम्यवादी विचारांच्या प्रभावात भारतीय साहित्याची जनवादी वाटचाल’ हा परिसंवाद झाला. महादेव खुडे म्हणाले की, प्रगतिशील लेखकाने सांस्कृतिक लढाई कोणत्या पातळीवर करावी याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत मांडले. किशोर मांदळे यांनी, प्रगतिशीलची भूमिका जनवादी केली पाहिजे. अन्यथा ती स्वप्नाळू ठरेल, असे सांगितले. परिसंवादाचे अध्यक्ष सुरेश केदारे यांनी, व्यवहाराशिवाय तत्त्वज्ञान वांझ असून तत्त्वज्ञानाशिवाय व्यवहार आंधळा ठरतो, असे नमूद केले. सुदाम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अरुण घोडेराव आणि रविकांत शार्दूल यांनी केले. सिल्केशा अहिरे यांचे रांगोळी प्रदर्शन, प्रमोद अहिरे यांचे चित्र प्रदर्शन आणि ‘मी प्रगतिशील’ हा सेल्फी पॉइंट हे आकर्षणाचे केंद्र ठरले.
