नाशिक – नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कारखान्यात शिरून धुडगूस घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर, निमा, आयमा, नाईस, लघू उद्योग भारती, निपम या औद्योगिक संघटनांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. नाशिकमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी निमा प्रयत्नशील आहे. दुसरीकडे उद्योजकांवर असे हल्ले झाल्यास त्याचा विपरित परिणाम गुंतवणुकीवर होईल. उपरोक्त प्रकार गुंतवणुकीला बाधा आणणारा तसेच रोजगार निर्मितीला खीळ घालणारा असल्याचे उद्योजकांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> नाशिक: दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू

अंबड औद्योगिक वसाहतीत निमाचे अध्यक्ष बेळे यांचा एस. एस. इंटरप्रायजेस हा कारखाना आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजता काही समाजकंटकांनी कारखान्यातील कार्यालयात शिरून सामान अस्ताव्यस्त केले. महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च बोलून शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून शिवीगाळ करीत दहशत माजविल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, आयमाचे निखील पांचाळ, नाईसचे रमेश वैश्य, लघु उद्योग भारतीचे विवेक कुलकर्णी आदींनी गुरुवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली. बेळे यांच्या कारखान्यावरील हल्ला हा सर्व उद्योजकांवरील हल्ला आहे. निमा नाशिकमध्ये बड्या उद्योगांनी गुंतवणूक करावी म्हणून प्रयत्न करते. अशावेळी असे हल्ले झाल्यास झाल्यास नाशिकची प्रतिमा खराब होण्याची शक्यता वाढल्याकडे प्रतिनिधींनी लक्ष वेधले. उपरोक्त प्रकाराने स्थानिक पातळीवर होणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होईल. या घटनेची त्वरित चौकशी करून सर्व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी संघटनांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली.

हेही वाचा >>> नाशिक : जळगावची आघाडी, नाशिक तळाला ; विभागाचा १२ वी निकाल ९१.६६ टक्के, गत वर्षीच्या तुलनेत २.६९ टक्के घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निमा अध्यक्षांच्या कारखान्यात जो प्रकार घडला, तसे चुकीचे प्रकार पुन्हा घडू नयेत, नाशिकसह राज्यातील शांततेला गालबोट लागता कामा नये, अशी व्यापारी व उद्योजकांची भावना आम्ही मांडली. पोलीस आयुक्तांनी उद्योजक, व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी यंत्रणेची असल्याची ग्वाही दिली आहे. बेळे यांनी तक्रार दिल्यास समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. – ललित गांधी (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज)