जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यात जळगाव महापालिकेतील लिपिकासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वी केली.
तक्रारदाराने जळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरील आधुनिक सार्वजनिक शौचालय चालवण्यास मिळावी म्हणून निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्याकरीता त्यांनी महापालिकेकडे निविदा भरताना सुमारे ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे भरली होती. मात्र, निविदा मंजूर न झाल्याने त्यांनी अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी २९ जुलै रोजी महापालिकेकडे अर्ज केला. त्या अर्जासंदर्भात महापालिकेतील लिपीक आनंद चांदेकर यांची भेट घेतली असता, अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच त्यांनी मागितली.
लाच द्यायची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करण्यात आल्यावर लिपीक चांदेकर यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे त्यांनी लाचेची रक्कम स्वतःकडे न घेता शहर समन्वयक राजेश पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. तक्रारदाराने पाच हजार रूपयांची रक्कम दिली आणि ती पंचासमक्ष संशयित लिपीक आनंद चांदेकर यांनी राजेश पाटील याच्यामार्फत स्वीकारली. या प्रकरणात संशयित चांदेकर आणि कंत्राटी कर्मचारी राजेश पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश पाटील, बाळू मराठे आणि भूषण पाटील यांनी सदरची कारवाई यशस्वी केली.
गेल्याच आठवड्यात पाचोरा उपविभागातील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला २९ हजार रूपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यापूर्वी बांबू लागवडीची चार प्रकरणे मंजूर करण्याकरिता ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी तसेच कार्यालयातील लिपीक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यास पकडले होते.
वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तक्रारदाराकून सुमारे २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठी विरोधातही गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या नक्कल देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे महसूल सहाय्यक जाळ्यात अडकले होते. दुसऱ्या प्रकरणात जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महिलेस तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. गेल्या काही दिवसांतील या सर्व लाचखोरीच्या प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेली लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. त्या विषयी नागरिकांमधूनही चिंता व्यक्त होत आहे.