जळगाव – गुजरात राज्यात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर आधुनिक आणि आकर्षक रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्प उभारला आहे. त्याच धर्तीवर जळगाव शहराजवळून वाहणाऱ्या गिरणा नदीलगत रिव्हर फ्रंट प्रकल्प विकसित करण्यास मोठा वाव आहे. त्या संदर्भात प्रस्ताव भाजप आमदार सुरेश भोळे यांनी राज्य सरकारकडे यापूर्वीच सादर केला आहे. त्यास बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यानंतर आता चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.
रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा नदी काठाचे सौंदर्य वाढविण्यासह पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि नागरिकांना विश्रांतीसाठी एक सुंदर परिसर उपलब्ध करून देणे असतो. याच उद्देशाने अहमदाबाद शहरात साबरमती नदीच्या काठावर काही वर्षांपूर्वी रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्या ठिकाणी नागरिकांना पायी चालण्यासाठी तसेच सायकल चालविण्यासाठी खास मार्ग विकसित केले आहेत. याशिवाय, हिरवेगार बगीचे, वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्सची सोय तिथे आहे.
पर्यटकांसाठी बोटिंग आणि क्रूझिंगच्या सुविधा उपलब्ध असल्याने, सदरचे ठिकाण कुटुंबियांबाबत फेरफटका मारणाऱ्यांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वास्तविक पर्यावरण सुधारण्याच्या दृष्टीकोनातून साबरमती रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत स्थानिक आणि देश-विदेशातील पर्यटकांसाठी अहमदाबादमधील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी तो एक बनला आहे.
जळगावमध्येही रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी आवश्यक असणारी अनुकूल स्थिती गिरणा नदीच्या काठावर उपलब्ध आहे. बांभोरी ते कानळदा गावांच्या दरम्यान असलेल्या गिरणा नदी काठालगत दोन्ही बाजुला सदरचा प्रकल्प विकसित झाल्यास पर्यटन विकासाला चालना तर मिळेलच, शिवाय केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. स्थानिक, देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिल्याने जळगाव शहराच्या आणि जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला देखील चांगली चालना मिळेल. गिरणा नदीच्या काठालगत कानळदा येथे प्रसिद्ध महर्षी कण्वाश्रम आहे. रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्पाला त्यामुळे आणखी एक वेगळे महत्व प्राप्त होईल.
आमदार सुरेश भोळे यांचा पाठपुरावा
गिरणा नदीच्या काठावर बांभोरी ते कानळदा दरम्यान रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्पाला चालना देण्याचा प्रस्ताव जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरून नुकतीच वाहतूक सुरू झाली आहे. उत्तर दिशेला विकसित होणाऱ्या नवीन जळगाव शहराच्या विकासाला गिरणा नदीवरील प्रस्तावित रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्प आणखी पूरक ठरू शकणार आहे. त्यादृष्टीने आता गिरणा नदीवरील प्रस्तावित रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्पाचा पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार भोळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.