जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले आहेत. सोमवारी देखील बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठे बदल झाल्याचे दिसून आले. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांना मोठा धक्का बसला.

जळगावमध्ये शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार ७९४ रूपयांपर्यंत होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच शनिवारच्या तुलनेत २०६ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख तीन हजार रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. याशिवाय, शनिवारी चांदीचे दर प्रति किलो एक लाख १४ हजार ३३० रूपयांपर्यंत होते. सोमवारी तब्बल २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी  एक लाख १६ हजार ३९० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. दोन्ही धातुंच्या दरात आठवड्याच्या सुरूवातीलाच वाढ झाल्याचे लक्षात घेऊन ग्राहकांनी खरेदीसाठी थोडा हात आखडता घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, सोमवारी सकाळी डॉलरच्या निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने देशांतर्गत वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले. डॉलरच्या कमजोरीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टॅरिफ संदर्भातील अनिश्चिततेचा फायदा देखील सोन्याच्या दराला झाल्याचा दावाही तज्ज्ञांनी केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच काही देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली असून, ही आक्रमक भूमिकाच जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण करत आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची आणि अमेरिका व जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तांकडे वळण्याचा कल दाखवला आहे. अमेरिकेतील रोजगार बाजारातही काहीशी कमकुवत परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता अधिक बळावली आहे. सप्टेंबरमध्ये फेडकडून दर कपात होईल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. ज्याचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या दरात अधिक स्थैर्य व वृद्धी दिसून येऊ शकते. एकूणच, डॉलरच्या कमजोरीसह जागतिक अनिश्चितता आणि फेडच्या संभाव्य पावलांमुळे मौल्यवान धातूंना चालना मिळत असून, यामध्ये पुढील काळातही वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सोने आणि चांदीच्या दरांमध्ये दररोज होणाऱ्या चढ-उतारामागे अनेक आर्थिक व सामाजिक घटक कार्यरत असतात. डॉलर-रुपया विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या सोन्या-चांदीच्या किमती, आयातीवर लागणारे सीमाशुल्क व कर आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेची स्थिती त्यास तेवढीच कारणीभूत आहे. भारतासारख्या देशात सोन्याला केवळ गुंतवणूक म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. लग्नसराई, सण-उत्सव, आणि विविध शुभ कार्यांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अशा काळात त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, ज्याचा परिणाम थेट किमतींवर होतो.