जळगाव – जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांना मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपिटीने दिलेल्या तडाख्यामुळे बरेच नुकसान सोसावे लागले. त्यातून सावरत नाही तितक्यात, सुमारे ६०० ते ७०० रुपयांपर्यंत केळीचे भाव पडल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

वाढत्या तापमानामुळे निसवणीच्या अवस्थेतील केळी बागांची होरपळ वाढल्याने शेतकरी आधीच हैराण आहेत. त्यात उत्पादित होणाऱ्या केळीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साधारण ११ एप्रिलपर्यंत व्यापाऱ्यांकडून केळीला किमान १००१, कमाल २०५० आणि सरासरी १५११ रुपये प्रति क्विंटलचा भाव दिला जात होता. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये समाधान होते. परंतु, १२ एप्रिलला रावेरसह लगतच्या तालुक्यात तसेच १३ एप्रिलला चोपडा, यावल तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानंतर केळी भावाला उतरती कळा लागली.

सद्यस्थितीत केळीचे भाव किमान ६००, कमाल १३७५ आणि सरासरी ११०१ रुपयांपर्यंत घसरले आहेत. अवकाळी पावसाचे वातावरण कायम असेपर्यंत संभाव्य नुकसानीच्या भीतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी घाई करून केळीची काढणी सुरू केली होती. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला. आता अवकाळी पावसाचे वातावरण निवळलेले असले तरी, कमी झालेल भाव वाढलेले नाहीत. परिणामी, केळी उत्पादकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

होळी-धुलिवंदन सणावेळी कमी झालेल्या केळीच्या भावात नुकतीच कुठे सुधारणा झाली होती. मात्र, अवकाळी पावसासह गारपिटीने दोन हजार प्रतिक्विंटलपर्यंत असलेले भाव १३०० रुपयांपर्यंत घसरल्याने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. – गोकुळ पाटील (केळी उत्पादक, चांगदेव, मुक्ताईनगर, जळगाव)