जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारात सोने दरात पुन्हा वाढ झाली आहे. ग्राहकांकडून मागणी वाढू लागल्याचा थेट परिणाम सोने दरावर झाला आहे. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख एक हजार ४५५ रुपयांवर पोहोचले.
जळगावच्या सुवर्ण बाजारात १९ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख दोन हजार ४८५ रुपयापर्यंत होते. मात्र, त्यानंतर लग्न सराईसाठी केली जाणारी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी थांबली. शेतकरी व शेतमजूर शेती कामात गुंतले. मागणी रोडावल्याने सोन्याचे दर बऱ्यापैकी म्हणजे एक लाखांच्या खाली आले. दरम्यान, श्रावण महिन्याची चाहूल लागताच खरेदीदारांनी पुन्हा बाजारात सक्रियता वाढवल्याने सोन्याच्या मागणीत पर्यायाने दरात आता हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
बाजारात सोन्याच्या किमती वाढण्यास बरेच घटक जबाबदार धरले जात असले, तरी जागतिक आर्थिक अनिश्चितताही सोन्याचे दर वाढविण्यास तितकीच कारणीभूत ठरली आहे. अमेरिका आणि युरोपमधील महागाईचा दबाव तसेच मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरांमधील संभाव्य बदलामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे वळले आहेत. आगामी काळातही सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सराफ व्यावसायिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यासह रक्षाबंधन, गौरी-गणपती आणि पुढील सणांचा विचार करता सोन्याच्या खरेदीत उत्तरोत्तर वाढ होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
चांदीच्या दरातही महिनाभरात सुमारे ४१२० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. जळगावमध्ये १९ जून रोजी चांदीचे दर जीएसटीसह एक लाख १२ हजार २७० रुपये होते. १९ जुलै रोजी चांदीचे दर एक लाख १६ हजार ३९० रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीच्या दरातील वाढ मागील काही आठवड्यांच्या तुलनेत लक्षणीय आहे. सौर पॅनेल तयार करण्यासाठी चांदीची मागणी जगभरात वाढली आहे. हरित ऊर्जा क्षेत्राच्या विस्तारामुळे चांदीचा औद्योगिक वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि अचूकतेवर आधारित वैद्यकीय उपकरणांमध्येही चांदीचा वापर अपरिहार्य ठरत आहे. औद्योगिक वापरामुळे चांदी आता केवळ दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. भविष्यात चांदीच्या किमती बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर नव्हे तर जागतिक औद्योगिक धोरणांवरही अवलंबून असतील, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुढील काही आठवडे चांदीच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांना सावध पाऊले टाकण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.