जळगाव – बाह्यवळण महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव उत्तर दिशेला विकसित होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. दरम्यान, बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमध्ये कृषी प्रक्रिया उद्योगांसह सोलर आणि आयटी पार्क सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यास आता चालना मिळाल्यास परिसरातील ग्रामीण भागाला त्याचा विशेष फायदा होऊ शकणार आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांची संख्या वाढल्यानंतर पाळधी ते तरसोद बाह्यवळण मार्गाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतिक्षीत असा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जळगावच्या विकासाला केवळ एक नवी दिशा मिळालेली नाही तर शहराचा उत्तरेकडे विस्तार होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव त्या दिशेने विकसित होण्याची चिन्हे दिसत असताना शहरालगतच्या गावांनाही आता भाव आला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रही तिकडे आकर्षित झाले आहे. तशात हा बाह्यवळण महामार्ग थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने तरसोद किंवा नशिराबादहून विमानतळाकडे जाणारा मधला रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून माहिती मागवली आहे. त्यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुके यापूर्वीच औद्योगिक सवलतीच्या डी प्लस झोनमध्ये समाविष्ट होते. त्यानंतर आता जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि यावल या तालुक्यांचाही त्यात समावेश झाला आहे. त्या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. डी प्लस झोनमध्ये समावेशामुळे जळगाव जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना आगामी १० वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करामधून १०० टक्के परतावा मिळू शकेल. विस्तार करणार्‍या जुन्या उद्योगांनाही नऊ वर्षांसाठी सदरचा परतावा मिळेल. याशिवाय, मुदत कर्जावर पाच टक्के व्याज परतावा, वीज दर आणि वीज वापरावर सवलत, वीज शुल्क माफी मिळेल. पायाभूत सुविधा व नवीन औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला गती येणार आहे. डी प्लस झोन दर्जाचे महत्व आणि त्यामुळे उद्योगांना मिळणारे प्रोत्साहन लक्षात घेता ही सुविधा पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गालगतच्या परिसराला लागू करण्याची मागणी शासनाकडे यापूर्वीच करण्यात आली आहे.

आमदार सुरेश भोळे यांचे प्रयत्न

जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण महामार्गालगतच्या पाळधी, बांभोरी, भोकणी, आव्हानी, आव्हाणे, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद या काही गावांमधील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांचा कृषी आधारीत प्रक्रिया तसेच इतर काही उद्योग सुरू करण्याकडे कल आहे. त्यामुळे बाह्यवळण महामार्गालगतच्या शेती शिवाराला बिनशेतीकरणासह शासनाच्या २०२३ च्या औद्योगिक धोरणानुसार डी प्लस दर्जा दिल्या दिल्यास अनेक उद्योग सुरू होऊ शकतील. ज्यामध्ये सोलर, आयटी पार्क आणि अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश असेल. त्यामुळे बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमध्ये औद्योगिक वसाहतीसाठी पूरक आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे यांनी यापूर्वीच शासनाकडे केली आहे.

बाह्यवळण महामार्गालगत असलेल्या गावांच्या शिवाराला बिनशेतीकरणासह डी प्लस दर्जा मिळाल्यास त्या भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसह सोलर तसेच आयटी पार्क सुरू होतील. मात्र, त्यासाठी एकत्रित ५० ते ६० शेतकऱ्यांनी जमिनी देण्यासाठी पुढे आले पाहिजे. – सुरेश भोळे (आमदार, जळगाव शहर)