जळगाव : जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यात मोठी जीवित आणि आर्थिक हानी झाली. पाऊस थांबल्यानंतर आता अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, औषधी आणि तर जीवनावश्यक वस्तुंची गरज त्यांना भासत आहे. या पार्श्वभूमीवर, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
आपत्ती कोणत्याही स्वरूपाची असो जळगाव जिल्हा मानवतेच्या दृष्टीकोनातून आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. जळगावमधील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेचा सुद्धा त्यात नेहमीच मोठा वाटा असतो. काही दिवसांपूर्वी पंजाब राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे अनेक भाग जलमय झाले. नदी-नाल्यांना आलेल्या महापूराने गावे उद्ध्वस्त झाली.
शेतजमिनी वाहून गेल्या आणि उभी पिके नष्ट झाली. शेकडो घरे जमिनदोस्त होऊन अनेक कुटुंबे बेघर व विस्थापित झाली. या आपत्तीच्या काळात मदतीची गरज ओळखून जळगाव जिल्ह्याने देखील पंजाबच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मदतीचा हात पुढे केला. रेडक्रॉस संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने पंजाब राज्याला तातडीने धान्य, कपडे, औषधे आणि इतर जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. तुमच्या या दु:खात आम्ही सोबत आहोत, हा संदेश जळगाव जिल्ह्याने पंजाबपर्यंत पोहोचविला.
अशाच प्रकारे, रेडक्रॉस म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे त्याग ही भावना समाजमनात दृढ व्हावी यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिरे घेण्यात आली. हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.अलिकडेच रेडक्रॉसने करूणेला संस्थात्मक रूप देतानाच मदत ही परंपरा बनविण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. ज्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता स्वतंत्र रक्तपेढी सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, सेवाभाव जोपासण्यासाठी रेडक्रॉसने आता पाचोरा तालुक्यातील आतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यासाठी जळगाव पिपल्स सहकारी बँक आणि वेगा केमिकल्सचे सहकार्य रेडक्रॉस सोसायटीला मिळाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी झेंडा दाखविल्यावर पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन मालमोटार रवाना झाली.
त्यात १०० सोलापुरी चादरी, ३०० चटई, १०० ब्लँकेट , ४२ टी-शर्ट, १२० बादल्या, १६५ किलो गूळ, २०० साड्या, १५० विविध प्रकारचे शर्ट, १० छत्र्या, १० बेडशीट, ८० उशा, १० बिछाना आच्छादन, तीन बॉक्स डोळ्यांची औषधी (बॉक्सिमेट), ७५ किलो मुलांचे कपडे, १८० कपडे धुण्याचे साबण आणि टूथब्रश, ८६१ बिस्कीट पुडे, १०० मॅट, १३० मुलांच्या पॅन्ट, दोन बॉक्स मसाले आणि घरगुती साहित्य, ९० बॉक्स पाण्याच्या बाटल्या आणि एक हजार नग मास्कचा समावेश होता.