जळगाव : शहर व परिसरात शुक्रवारी साजरा होत असलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बहुतेक सर्व शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्या बाबतीत जळगाव महापालिका देखील मागे राहिलेली नाही. पंरतु, संबंधित प्रशासनाने शहरातील अस्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, शहरात जिकडे पाहावे तिकडे कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. त्याबद्दल नागरिकांनीही सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. 

जळगाव शहरात अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डास, माश्या आणि इतर रोगकारक कीटकांची वाढ होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. स्वच्छतेबाबत प्रशासनाची निष्क्रियता आणि नियोजनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, शहरातील सफाईचे कंत्राट बीव्हीजी इंडिया कंपनीला देण्याचे निश्चित झाले असून संबंधितांनी सुमारे दीड कोटी रुपयांची अनामत आणि साडेतीन कोटी रुपयांची बँक हमी यापूर्वीच सादर केली आहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने कार्यादेश न दिल्याने सफाईचे काम सुरू करावे की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत कंत्राटदार कंपनी सापडली होती.

परिणामी, शहरातील अस्वच्छतेची समस्या आणखी तीव्र झाली होती. आता उशिरा का होईना बीव्हीजी कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट आणि त्यासाठीचे कार्यादेश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात संबंधित कंत्राटदार कंपनी एक सप्टेंबरपासून शहरातील स्वच्छतेचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. तोपर्यंत शहराची स्वच्छता अक्षरशः वाऱ्यावर सोडून देण्यात आली आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष राहिलेली नाही. 

महानगरपालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला २०१८ मध्ये शहरातील सफाईचे कंत्राट पाच वर्षांसाठी दिले होते. याशिवाय, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन निविदा प्रक्रिया मंजूर होईपर्यंत काम करण्याच्या अटीवर वॉटरग्रेसला पुन्हा मुदतवाढ दिली होती. दरम्यान, आधीची पाच वर्षे आणि मुदतवाढ दिलेल्या एका वर्षात सातत्याने स्वच्छतेच्या कामात कुचराई केल्याने नागरिकांसह सत्ताधारी आणि विरोधकांच्या तीव्र असंतोषाला वॉटरग्रेस कंपनीला तोंड द्यावे लागले.

त्यानंतरही जळगावमधून गाशा गुंडाळण्याची तयारी करण्याऐवजी वॉटरग्रेसने आता नव्याने राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत पुन्हा सहभाग घेतला आहे. स्वच्छतेचे कंत्राट आपल्यालाच मिळाले पाहिजे म्हणून न्यायालाचे दार ठोठावून महापालिकेला अडचणीत आणले आहे.