जळगाव : जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारपर्यंत २०० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सदस्यपदासाठी ३५०० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
जिल्ह्यात भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा, या १६ नगर परिषद अस्तित्वात आहेत. तर शेंदुर्णी, मुक्ताईनगर आणि बोदवड या तीन ठिकाणी नगर पंचायती आहेत.
बोदवड येथे यापूर्वीच नगर पंचायत अस्तित्वात असल्याने १८ ठिकाणी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवार अखेर सदस्यपदाच्या ४६४ जागांसाठी एकूण सुमारे ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर नगराध्यक्षांच्या १८ जागांसाठी एकूण २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. भुसावळमधील अखेरच्या दिवशी दाखल अर्जांची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही.
दरम्यान, सोमवारी शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवसांत सदस्यपदासाठी १६७३ आणि नगराध्यक्षपदासाठी १२८ अर्ज दाखल करण्यात आले. सोमवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन (जामनेर), आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण (चाळीसगाव) यांचाही समावेश होता. मंगळवारी दाखल झालेल्या सर्व अर्जांची ठिकठिकाणी छाननी होणार असून, शुक्रवारपर्यंत अपील नसेल तिथे संबंधितांना अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतर २६ तारखेला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यात अंतिम मतदार यादीनुसार, पुरूष मतदारांची संख्या सुमारे चार लाख ५० हजार ८९३ तसेच स्त्री मतदारांची संख्या चार लाख ३८ हजार ९३८ आणि इतर मतदारांची संख्या ८३ इतकी आहे. या अनुषंगाने ९७७ मतदान केंद्रे, १२९० कंट्रोल युनिट आणि २७४३ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४६४ सदस्यांसाठी निवडणूक होत असून, त्यात एक सदस्यीय प्रभाग ३४, दोन सदस्यीय प्रभाग २०६ आणि तीन सदस्यीय प्रभाग सहा असणार आहेत.
मतदारांना सहा ठिकाणी नगराध्यक्षांसह तीन सदस्यांच्या निवडीसाठी चार मते तसेच २०६ ठिकाणी नगराध्यक्षांसह दोन सदस्यांच्या निवडीसाठी तीन मते देण्याचा अधिकार असेल. एकूण ९७७ मतदान केंद्रांसाठी सुमारे पाच मनुष्यबळ प्रति केंद्र अशा प्रमाणात कर्मचारी नेमले जाणार आहेत. त्याच प्रमाणे २० टक्के अतिरिक्त राखीव मनुष्यबळ ठेवले आहे. ईव्हीएमची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे बारकोड स्कॅनिंगची प्रक्रिया देखील पूर्ण.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
● नामनिर्देशन पत्र दाखल : १० ते १७ नोव्हेंबर
● नामनिर्देशन पत्रांची छाननी : १८ नोव्हेंबर
● नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर
● निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी : २६ नोव्हेंबर
● मतदान : दोन डिसेंबर
● मतमोजणी व निकाल : तीन डिसेंबर
