जळगाव – शहरातील रेडक्रॉस संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील नागरिकांच्या सामाजिक, आरोग्यविषयक आणि मानवतावादी गरजा लक्षात घेता पाच सहाय्यक संस्थांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. ज्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आता रक्तपेढी उभारली जाणार आहे. नागरिकांना त्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंगी रक्त संकलनासह सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात रक्त उपलब्ध होऊ शकणार आहे.
पंजाबच्या काही भागांत आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली. शेती वाहून गेली. अनेक घरे जमिनदोस्त झाली आणि शेकडो कुटुंबे विस्थापित झाली. या दु:खाच्या लाटेतही पंजाबच्या जनतेचे धैर्य अढळ राहिले. कठीण प्रसंगी जळगाव जिल्ह्यानेही मदतीचा हात पुढे केला. रेडक्रॉस संस्थेच्या माध्यमातून आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने पंजाब राज्याला आवश्यक धान्य, कपडे आणि जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. दु:खाच्या क्षणी आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा भावनिक संदेश जळगावने पंजाबपर्यंत पोहोचविला. रेडक्रॉस म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे त्याग. याच भावनेतूनच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरांमधूनही हजारो नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती बांधिलकी जपली होती.
दरम्यान, रेडक्रॉस संस्थेने करुणेला संस्थात्मक रूप देतानाच मदत ही परंपरा बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. ज्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता स्वतंत्र रक्तपेढी सुरू करण्यात येणार आहे. रक्तपेढी ही वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यावश्यक सेवा आहे, जी रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्ताची सुरक्षित आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करते. शस्त्रक्रिया, गंभीर अपघात, ॲनिमिया आणि इतर आजारांमध्ये रूग्णांना रक्ताची किंवा रक्त घटकांची आवश्यकता असते. रक्तपेढीमध्ये रक्ताचे संकलन, चाचणी, प्रक्रिया, साठवण आणि योग्य वेळेत गरजूंना रक्त पुरवठा करण्याचे कार्य केले जाते. रेडक्रॉस संस्था आतापर्यंत केवळ जिल्हास्तरावर कार्यरत होती. त्यापुढे जाऊन प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल.
या व्यतिरिक्त, सक्रीय आणि सहयोगी सदस्यांचा वेळ, क्षमता आणि सहभाग यांचा नियोजनबद्ध वापर करून रेडक्रॉस संस्था पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम राहणार आहे. तसेच एचआयव्ही एडस् बाधित क्षेत्र, क्षयरोग आणि कुष्ठरोग प्रवण भागांमध्ये विशेष ओपीडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गोवर आणि ॲनिमिया मुक्तीसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मोहिमांना बळ देण्यात येणार आहे. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून अपंग, अपघातग्रस्त, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवरील उपचार, सहाय्यक उपकरणे आणि उपचारात्मक काळजी घेतली जाईल. अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेम, सेवा आणि सुरक्षिततेची हमी देणारे सावली केंद्र उभारले जाईल. या सर्व संस्थांमुळे जळगाव जिल्ह्यात मदतीची साधने कायमस्वरूपी उपलब्ध होऊन नागरिकांना सन्मानाने आणि विश्वासाने जगण्याचा आधार मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.