जळगाव – विद्यार्थ्यांमध्ये साखरयुक्त पेय आणि पदार्थांच्या अति सेवनामुळे आरोग्याविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रौढांना होणारा मधुमेह आता विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा परिषदेने ‘नो शुगर’ हा उपक्रम सर्व प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यास सुरूवात केली आहे.
साखर आणि लठ्ठपणा यांचा परस्पर संबंध आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज भरपूर आणि पौष्टिक मूल्ये कमी प्रमाणात असतात. साखरेचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केलेले पेये, स्नॅक्स आणि पदार्थ खाल्ल्याने झपाट्याने वजन वाढू शकते. ज्यामुळे बालवयात आणि नंतरच्या आयुष्यात लठ्ठपणाचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, जास्त साखरेचे सेवन सामान्य चयापचय प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणू शकते. मुलांना त्यांचे वजन नियंत्रित करणे कठीण जाते. एके काळी प्रौढांमध्ये आढळणारा मधुमेह आता मुलांमध्ये आढळून येत आहे. जास्त साखरेचे सेवन मधुमेहाचा पूर्वसूचक असलेल्या इन्सुलिन प्रतिरोधनाचा धोका वाढवते. जास्त साखरेचे सेवन करणाऱ्या मुलांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि कालांतराने त्यांना मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.
ही स्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्हा परिषदेकडून नो शुगर सारखा उपक्रम प्राथमिक मराठी शाळांमध्ये राबविला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व मराठी शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नो शुगर फलक लावण्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. या फलकांवर विविध शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील साखरेचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील साखरेपासून होणारे धोके पटवून देणे तसेच निरोगी जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रेरित करणे, हा उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
वेळीच साखरेचे अतिसेवन टाळल्यास मधुमेहासह वेगाने होणारी वजन वाढ यांसारख्या अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. या अनुषंगाने शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये योग्य आहार शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी नो शुगर उपक्रम प्रभावी ठरत आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि भविष्यासाठी दीर्घकालीन परिणामकारक ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी व्यक्त केला.