जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाले, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का, महिलांवरील अत्याचार थांबले का, बेरोजगारी कमी झाली का, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. नांदगाव मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ येथील शिवस्फूर्ती मैदानावर झालेल्या प्रचार सभेत मिटकरी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील महायुतीचे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार हे वाढत असताना सरकारला राम मंदिराच्या समस्येचे पडलेले आहे. पाच वर्षांत महाराष्ट्रात जाती-धर्माची तेढ फडणवीस सरकारने वाढवली, अशी टीका मिटकरी यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले. १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यापेक्षा १० रुपयांत उच्च शिक्षण द्या, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरसकट कर्जमाफी व्हावी हे आमच्या जाहीरनाम्यात म्हटले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तर युतीचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच आले आहे. केंद्राने कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले.  राज्यातील कंपन्याही आता बंद पडायला लागल्या आहेत. लोक बेरोजगार होत आहेत. शिवस्मारक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काय झाले, बेरोजगारी, महिला अत्याचार, महागाई यावर शिवसेनेने कोणती भूमिका घेतली? असे प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारले.

व्यासपीठावर माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राजेंद्र भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir farmer suicide akp
First published on: 18-10-2019 at 01:09 IST