नाशिक : गुन्हेगारी रोखण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासह पोलीस आणि जनता यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने जनसंवाद अभियानाची तयारी करण्यात आली आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलिसांचे महत्व पटवून दिले जाणार आहे. गावातील एखाद्या प्रकरणात निष्पक्षपणे कारवाईसाठी जनसंवाद अभियानाची पोलिसांना मदत होऊ शकेल. तसेच थेट पोलीस ठाण्यात न जाताही नागरिकांना पोलिसांपर्यंत आपले म्हणणे मांडता येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मंगळवारी जिल्ह्यातील संपादक आणि विभागप्रमुखांशी अधीक्षक पाटील यांनी आगामी काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, त्याविषयी चर्चा केली. २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या कामगिरीचा भार एकिकडे पेलताना, जिल्हा ग्रामीण पोलिसांनी थेट गावागावापर्यंत पोहचण्यासाठी पाऊले उचलली आहेत. जनसंवाद अभियान हा त्याचाच एक भाग.
एखाद्या गावातील घडामोडींची माहिती घेण्यासाठी सध्या पोलिसांना पोलीस पाटील, सरपंच अशा काही ठराविक मंडळींवरच अवलंबून राहावे लागते. या मंडळींकडून मिळणारी माहिती संतुलित राहीलच, याची शक्यता नसते. शिवाय गावातील हिच मंडळी पोलिसांच्या दारी पोहचत असल्याने इतर नागरिकांशी पोलिसांचा संबंध दुरावतो. नागरिकही पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हा दुरावा दूर होऊन पोलीस आणि नागरिक यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण व्हावेत, हा जनसंवाद अभियानाचा हेतू आहे.
या अभियानातंर्गत प्रत्येक गावाशी एका पोलीस कर्मचाऱ्याचा संबंध येणार आहे. संबंधित पोलीस कर्मचारी त्या गावातील शिक्षक, मुख्याध्यापक, भजनी मंडळ, बचत गट, व्यायामशाळा आदींशी संबंधित १००, २०० नागरिकांचा एक व्हाॅटसअप गट तयार करणार. त्या गटाशी संबंधित सर्व मंडळी त्यांना करावयाच्या सूचना, माहिती देत जातील.
यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला दररोज न जाताही गावात कोणकोणत्या घडामोडी होत आहेत, हे लक्षात येऊ शकेल. त्यामुळे एखादा गुन्हा घडण्याआधीच परिस्थिती निस्तरता येऊ शकेल. गावांमध्ये शक्यतो शेतीविषयक कारणांवरुन अधिक गुन्हे होतात. दोन शेतकऱ्यांंमध्ये यासंदर्भात भांडण होण्याची शक्यता असल्याचे अशा व्हाॅटस अप गटामार्फत आधीच समजल्यास ते होऊ नये, यासाठी पोलिसांना प्रयत्न करता येतील. गुन्हा घडल्यावर कार्यवाही करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये, यासाठी हे अभियान मोलाची भूमिका निभावू शकेल.
या जनसंवाद अभियानातंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये (भ्रमणध्वनीची संपर्क व्यवस्था नसलेल्या गावांचा अपवाद) असे व्हाॅटस अप गट तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नागरिक आणि पोलीस यांचे संबंध दृढ व्हावेत, एखादा गुन्हा घडण्याआधीच कार्यवाही करता यावी, सर्वसामान्यांनाही पोलिसांशी संपर्क साधता यावा, या हेतूने जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही या अभियानास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. -बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक)