ठिकठिकाणी गर्दी जमवत शक्तीप्रदर्शन, काही ठिकाणी वाहतूककोंडी
नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथून निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे, आदिवासी नृत्य आदींच्या माध्यमातून भाजपने शक्तीप्रदर्शन केले. केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर डॉ. पवार पहिल्यांदाच जिल्ह्य़ात आल्यामुळे ठिकठिकाणी सत्कार सोहळे रंगले. धान्य वितरण कार्यक्रम पार पडले. गर्दीमुळे करोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले. मुखपट्टीविना अनेक जण वावरत होते. छोटेखानी कार्यक्रमात सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले गेले नाही. यात्रेच्या निमित्ताने पक्षीय प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला.
जनआशीर्वाद यात्रेची सुरूवात सकाळी ओझरलगतच्या दहावा मैल येथून झाली. डॉ. पवार यांच्या लोकसभा मतदारसंघाचे हे क्षेत्र. केंद्रीय राज्यमंत्री मिळाल्यानंतर लगोलग अधिवेशन असल्याने त्या मतदारसंघात येऊ शकल्या नव्हत्या. यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ओझर, पिंपळगाव, चांदवडसह गावोगावच्या भाजप कार्यकर्त्यांनी केली. यात्रेत देवयानी फरांदे, राहुल आहेर या आमदारांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, लक्ष्मण सावजी आदी पदाधिकारी सहभागी झाले.
दुचाकी फेरी आणि २० ते २५ वाहनांचा ताफा दहाव्या मैलावर आल्यानंतर यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महामार्गावर वाहने उभी करून सव्र्हिस रस्त्यावर कार्यक्रम झाला. जऊळके येथे वृक्षारोपण करण्यात आले. नंतर ओझर येथे नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यात्रेचा ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, मालेगाव, नामपूर, ताहाराबाद, पिंपळनेरमार्गे नंदुरबार असा मार्ग आहे. तथापि, महामार्गावर गावोगावी होणारे सत्कार, स्थानिकांशी संवाद यामुळे वेळेचे गणित बिघडले. प्रत्येक ठिकाणी ५०० ते हजारच्या आसपास लोक जमले होते. कित्येकांनी मुखपट्टी परिधान केलेली नव्हती. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालणे मंत्री वा पदाधिकाऱ्यांना कठीण झाले. पालघर येथून सुरू झालेली ही यात्रा पाच लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. नाशिकनंतर पिंपळनेर, साक्री, नंदुरबारमार्गे २० ऑगस्ट रोजी धुळे येथे यात्रेचा समारोप होईल.
देशात दररोज ४० लाख लसमात्रा
देशासाठी दररोज ४० लाख लसमात्रा उपलब्ध होत आहे. केंद्राकडून महाराष्ट्रासह सर्व राज्यांना लसीचा पुरवठा योग्य पध्दतीने होत आहे. राज्य शासनाने नियोजन करण्याची गरज आहे. १५ दिवस आधीच किती लसीचा पुरवठा होणार, याची माहिती दिली जाते, याकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लक्ष वेधले. काही राज्यानी लसीचे बरेच नुकसान केले. एक लाख मात्रापर्यंत हे नुकसान आहे. महाराष्ट्रात प्रारंभी काहीअंशी नुकसान झाले. परंतु, आता परिस्थिती ठीक आहे. देशात तिसरी लाट येऊ नये अशी अपेक्षा आहे. ती आल्यास केंद्र सरकार स्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले.
मुखपट्टीचे वितरण..
जनआशीर्वाद यात्रेत लसीकरण झालेल्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. यात्रेला गर्दी झाली असली तरी पक्षाकडून मुखपट्टींचे वितरण होत असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. यात्रेमागे राजकीय हेतू नाही. जनतेचा आशीर्वाद घेण्यासोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा असल्याचे त्यांनी नमूद केले.