नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील आगीच्या दुर्घटनेमुळे या ठिकाणी कार्यरत २६०० कामगारांचे भवितव्य अधांतरी झाले आहे. कारखाना इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण आणि सुरक्षेसंबंधी उपाय केल्याशिवाय हा प्रकल्प सुरू करण्यास औद्योगिक सुरक्षा विभागाने प्रतिबंध केला आहे.
अडीच वर्षात या कारखान्यास आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीच्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले होते. यावेळी जीवितहानी झाली नाही. वितळलेल्या प्लास्टिकवर पाय पडून दोन कामगार जखमी झाले. चार दिवसांच्या प्रयत्नांती आग आटोक्यात आली. तोपर्यंत कच्चा माल, अनेक विभाग भस्मसात झाले. औद्योगिक सुरक्षा विभागाने कारखान्याच्या संरचनेची दुरुस्ती, सुरक्षेचे उपाय केल्याशिवाय प्रकल्प सुरू करता येणार नसल्याची नोटीस बजावली आहे.
या प्रकल्पात बीओपीपी आणि पीईटीसह विविध फिल्म्सचे उत्पादन होते. कारखान्यात २६०० कामगार कार्यरत आहेत. बहुसंख्य कंत्राटी स्वरुपातील आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर कामगार उपायुक्त कार्यालयाने व्यवस्थापनाकडून ही माहिती प्राप्त केली. कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने पूर्ववत होण्यास किती कालावधी लागेल हे सांगणे अवघड आहे. औद्योगिक सुरक्षेचे निकष पूर्ण केल्याशिवाय उत्पादन सुरू करता येणार नाही. या परिस्थितीत २६०० कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा आपत्तीत व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात कामावरून कमी करू शकते. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जातो, अशी माहिती कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. जिंदाल पॉलीफिल्म्सकडून कुठला मार्ग अवलंबला जाईल हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.