गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे पोलिसांना साकडे

सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या केबीसी घोटाळयातील सहसूत्रधार चंद्रकांत तिर्लोतकर व त्याची पत्नी यांच्या कंपन्यांची गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने केली आहे. या कंपन्यांच्या आधारे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणने परदेशात पैसा गुंतविल्याची शंका समितीने व्यक्त केली आहे.
मागील वर्षी उघडकीस आलेल्या केबीसी घोटाळ्याने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना झळ सोसावी लागली. त्यांचे कोटय़वधी रुपये अडचणीत सापडले. या आर्थिक घोटाळ्याने सारेच चक्रावले. या संदर्भात समितीच्यावतीने मार्च २०१४ मध्ये आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यासाठी आवश्यक ती माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांनी त्या निवेदनाकडे तसेच तक्रारीकडे दुर्लक्ष केले. गुरूवारी समितीने आर्थिक गुन्हे शाखेला नव्याने निवेदन देऊन भाऊसाहेब चव्हाण ज्या कंपनीत सहसंचालक म्हणून कार्यरत होता, त्याची माहिती सादर केली आहे. डोंबिवली येथील चंद्रकांत भिवन तिलरेतकर व पत्नी सोनाली यांच्या नावे असणाऱ्या एफ एक्स रीच बुलयिन फायनान्शियल सव्‍‌र्हिस कंपनीत केबीसीचा सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण हा सहसंचालक म्हणून कार्यरत होता. या कालावधीत चव्हाण आणि तिलरेतकर यांनी संगनमताने गुंतवणुकदारांचा पैसा परदेशात गुंतविला. त्यात तिलरेतकर याची भूमिका संशयास्पद असून त्याच्या सीएमआयएम व्हेनचर प्रा. लि, बॉईंडेड ट्रेडिंग प्रा. लि, कोणार्क मेडिकेअर लि. या कंपनीसह पत्नी सोनाली हिच्या नावे असलेली धानुज टेक्नॉलॉजीचा संपुर्ण तपशील देण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी समितीने केली.
भाऊसाहेब चव्हाण याचा भाऊ नानासाहेबची देवळाली कॅम्प परिसरात कंपनी आहे. तिच्या कामकाजासह कायदेशीररित्या आवश्यक माहिती देण्यात आली आहे. या कंपनीचा कारभार संशयास्पद असून देवळाली कॅम्प येथील एका वसाहतीत भाऊसाहेबच्या मालकीची सदनिका आहे. या मालमत्तेची छाननी करावी, असे समितीचे संस्थापक देवांग जानी यांनी म्हटले आहे.
या माहितीमुळे पुढील तपासास दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी शामला दीक्षित, दिगंबर धुमाळ, भरत जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.