नगरच्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार तिचा खून करणाऱ्या नराधमांना फासावर लटकविण्याची मागणी शहर व जिल्ह्य़ातील विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र या घटनेचा निषेध करण्यात येत असून निषेधाचे वेगवेगळे मार्ग अवलंबिण्यात येत आहेत. विद्यार्थिनींनी शाळेत शपथ घेणे, गाव बंद ठेवणे, पत्र पाठविणे, स्वाक्षरी अभियान अशा पध्दतीने सर्वच जण या घटनेविरोधातील आपला संताप व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवतेला काळिमा फासेल असे हे घृणास्पद कृत्य आहे. त्यामुळे या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच भविष्यात असे घृणास्पद कृत्य होऊ नये यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन कठोर कायदा करावा, अशी मागणी मनसे महिला आघाडीतर्फे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. सदर गुन्ह्य़ाचा निकाल लवकरात लवकर लावावा. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. नाशिक शहरात अशी घटना घडू नये म्हणून शहरातील बस स्थानक, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी रिना सोनारस, कामिनी दोंदे, भानुमती अहिरे आदींसह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातही या संदर्भात निवेदन देण्यात आले.

मराठा एकीकरण समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे व इतर नराधमांनी अत्यंत क्रूर पध्दतीने या अल्पवयीन मुलीची हत्या केली असून अत्याचाराचा कळस गाठणाऱ्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावा, सरकारी पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर अजित गायकवाड, मंगेश पगार, सुभाष पाटोळे, संदीप गायकवाड, शरद जगताप, अ‍ॅड. रमेश गायकवाड आदींची नावे आहेत. कोपर्डी घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे समाजातील महिला व मुलींमध्ये प्रचंड संताप आणि तीव्र असंतोष व्यक्त होत असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पूर्व विभागाच्या अध्यक्षा अनिता भामरे यांनी म्हटले आहे. या गुन्ह्य़ातील बलात्कारी नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण जलद न्यायालयामार्फत चालविण्यात यावे तसेच शासनाला महिलांची व मुलींची सुरक्षितता करता येत नसेल तर महिला व मुलींना स्वरक्षणार्थ आत्मसन्मानासाठी बंदुकांचा परवाना शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर गुरूप्रीत बिंद्रा, रंजना गांगुर्डे, मनीषा जेठवा आदींची स्वाक्षरी आहे.

कोपर्डीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लागली असून या घटनेमुळे महाराष्ट्रात मुली, महिला असुरक्षित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा प्रखरतेने समोर आले असल्याचे सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समितीने म्हटले आहे. प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, यापुढे असे गुन्हे होणार नाहीत व महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होईल अशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन समितीमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहे. निवेदनावर राजू देसले, सुनील मालुसरे, करुणासागर पगारे, महादेव खुडे आदींची स्वाक्षरी आहे. शहरात ही स्थिती असताना जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात गाव बंद ठेवण्याचे सत्र सुरू आहे. नांदगाव, देवळा, कळवण या गावांतील बंदमध्ये सर्वानी सहभाग घेतला. बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांना धुळे लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येऊन कोपर्डी प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर युवक काँग्रेसचे धुळे लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे, सटाण्याचे नगरसेवक मनोज सोनवणे, ताहाराबाद ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितीन पवार आदींची नावे आहेत. आरोपींविरुद्धच्या खटल्याचा केवळ लवकर निकाल लागून उपयोग नाही. त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेची वर्षभराच्या आत अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच अशा प्रवृत्तींना वचक बसू शकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kopardi rape murder case reaction in rural areas
First published on: 23-07-2016 at 01:13 IST