नाशिक – महाराष्ट्रासह देशाला हादरविणाऱ्या मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाशी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे यांचा संबंध असून त्यांच्या सांगण्यावरून आपले वडील पोपट शिंदे यांनी हे कृत्य केल्याचा आरोप या प्रकरणातील एक संशयित कुणाल शिंदे याने जाहीर नोटीसीद्वारे केला आहे. यासंदर्भात वारंवार दाद मागूनही आजवर न्याय मिळाला नसल्याची तक्रार त्याने केली आहे. या आरोपांविषयी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास आ. सुहास कांदे यांनी नकार दिला.
नांदगाव तालुक्यातील मनमा़डलगत प्रमुख इंधन कंपन्यांचे तेल आगार आहेत. या भागातून राज्यातील वेगवेगळ्या भागात इंधन पुरवठा केला जातो. २५ जानेवारी २०११ रोजी या भागातील इंधन भेसळीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सोनवणे गेले असता त्यांना भरदिवसा माफियांनी इंधन टाकून जाळून टाकले होते. या हत्याकांडात पोपट शिंदे, मच्छिंद्र सुरवडकर, राजू शिरसाठ, अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पाच संशयित होते. सुनावणीदरम्यान पोपट शिंदेचा मृत्यू झाला. त्यावेळी कुणाल शिंदे अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल न्यायालयात खटला चालला.
मालेगावच्या सत्र न्यायालयाने १० वर्षानंतर सुरवडकर, शिरसाठ आणि सोनवणे या तिघांना जन्मठेप सुनावली होती. सुमारे १४ वर्षांनी या प्रकरणाविषयी मयत पोपट शिंदेचा मुलगा कुणाल शिेदेने नोटिसीद्वारे गंभीर आरोप केले आहेत. वडिलांच्या बेकायदेशीर इंधन भेसळ व्यवसायात विद्यमान आमदार सुहास कादे हे भागीदार होते. कांदे यांच्या सांगण्यावरूनच वडिलांनी अपर जिल्हाधिकारी सोनवणे यांना जिवे मारले. कांदे यांनी नंतर राजकीय दबाव वापरून माझ्या वडिलांनाही संपविले, असा आरोप कुणालने नोटिसीत केला आहे. यासंदर्भात आपण तक्रारी केल्यावर कांदे यांच्याकडून आपल्यासह परिवारावर हल्ले करणे, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाल्याचेही कुणालने म्हटले आहे.
कांदे यांचा व्याजाने पैसे देण्याचा मोठा व्यवसाय आहे. आपल्यासह अनेक कुटुंब कांदे यांच्या व्याजाला कंटाळून रस्त्यावर आली. लोकांच्या जमिनी लाटण्याचे प्रकार होत आहेत. कुणी त्यांच्याविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या परिवाराला मारण्यात येते. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात, असा आरोपही कुणाल शिंदेने केला आहे.
संबंधित गुन्ह्यातील आरोपीने केलेल्या आरोपांबाबत कुठलीही प्रतिक्रिया आपणास द्यायची नसल्याचे आ. सुहास कांदे यांनी सांगितले. कुणाल शिंदे गुन्हेगार असून त्याच्यावर मकोकातंर्गत कारवाई झालेली आहे. त्याने नोटिसीद्वारे केलेल्या आरोपांवर प्रसारमाध्यमांनी शहानिशा करण्याची गरज आहे. अन्यथा, संबंधित वृत्तपत्रांना नोटीस बजावली जाईल, असा इशारा कांदे यांनी ‘लोकसत्ता’ ने संपर्क साधला असता दिला.