जळगाव – केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमानाद्वारे कमी खर्चात शेती माल पाठविण्याच्या योजना सुरू केल्या आहेत. परंतु, सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र माल वाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवासी विमानांद्वारे मर्यादित प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. येथे नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेती मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी उडान योजनेत देशभरातील ५८ विमानतळांचा समावेश करण्यात आला असताना, त्यात महाराष्ट्रातील नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि जळगाव विमानतळेही अंतर्भूत आहेत. या योजनेद्वारे शेतकरी व शेती मालाच्या निर्यातदारांना हवाई मार्गाने मालाची स्वस्त, जलद आणि सुलभ वाहतूक करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, आवश्यक कार्गो टर्मिनलच्या अभावामुळे राज्यातील अनेक विमानतळांवर ही योजना अद्याप प्रभावीपणे सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, शेतकरी व निर्यातदारांना अपेक्षित लाभ मिळण्यात विलंब होत आहे. येत्या काळात कार्गो टर्मिनल सुविधा उपलब्ध झाल्यास राज्यातील कृषी उत्पादनांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी वाढ होऊ शकेल.
स्वतंत्र कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर जळगाव विमानतळावर शीतगृह, गोदाम आणि जलद माल वाहतूक सुविधा मिळतील. खास शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत योजना राबविल्या जातील. केंद्र सरकारच्या कृषी उडान योजनेतून शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला आणि इतर शेतमाल कमी खर्चात विदेशात हवाई मार्गाने पाठवता येईल. स्थानिक कृषी सहकारी संस्था आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे आवश्यक तांत्रिक सहकार्य निर्यातदारांना मिळेल. यामुळे समुद्री मार्गे होणाऱ्या शेती मालाच्या वेळखाऊ निर्यातीला एक सक्षम आणि जलद पर्याय उपलब्ध होईल. सद्यःस्थितीत जळगाव विमानतळावरून माल वाहतुकीचे प्रमाण खूपच कमी आहे. स्वतंत्र कार्गो टर्मिनल नसल्याचे कृषी उडान योजनेअंतर्गत होणारी शेती मालाची वाहतूक नसल्यासारखीच आहे.
जळगाव जिल्ह्यातून २०२४-२५ मध्ये इराणसह इराक, नेपाळ, ओमान, सौदी अरब, युएई, उझबेकिस्तान, रशिया, स्पेन आदी देशांना समुद्री व इतर मार्गाने सुमारे ११० कोटी रूपयांची निर्यात झाली. याशिवाय, ऑस्ट्रेलियासह कॅनडा, जर्मनी, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, फ्रान्स, अफगाणिस्तान, बेल्जियम, अमेरिका आणि ग्रीस देशामध्ये डाळींची ४१८० कोटींची निर्यात झाली. तसेच अंगोलासह बांगलादेश, कंबोडिया, बहरीन, इराक, जॉर्डन, कतार, मलेशिया, स्वीडन, हाँगकाँग, इस्राएल, जर्मनी, कुवेत, सिंगापूर, यूके, अमेरिका आणि युएईमध्ये मक्यापासून तयार होणाऱ्या स्टार्च, पीठ, फ्लेक्स, पेंड यांची २६८.६२ कोटी रूपयांची निर्यात झाली. माल वाहतूक विमानसेवा सुरू झाल्यानंतर शेती मालाच्या निर्यातीला आणखी चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
जळगाव विमानतळावरून हवाई माल वाहतुकीची सध्या मागणी नाही. मात्र, प्रवासी विमान कंपन्यांसोबत थोड्याफार माल पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. कोणत्याही कार्गो किंवा लॉजिस्टिक्स कंपन्यांकडे त्यासाठी नोंदणी करावी लागते. – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)