ढोल ताशांचा गजर..बँण्डचा दणदणाट.. तुताऱ्यांची सलामी..फुलांनी सजविलेले रथ..पारंपरिक शस्त्रास्त्रांसह सहभागी झालेले नागा साधू..आसमंतात डौलाने फडकणारे धर्मध्वज, आणि या सर्वाच्या जोडीला ‘हर हर महादेव’ होणारा जयघोष..
अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारी पहाटे चारपासून त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तात सिंहस्थाच्या तिसऱ्या शाही स्नानास सुरूवात झाली. आखाडय़ांचे शाहीस्नान सुरू असतानाच भाविकांनी मोठय़ा प्रमाणात घुसखोरी केल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरची पर्वणी साधण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्यामुळे दुपारी १२ पर्यंत नाशिकहून त्र्यंबककडे येणारी बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परंतु, हा अडथळा पार करून भाविकांनी १५ ते २० किलोमीटर पायपीट करत स्नानाचा योग साधला.
तिसऱ्या शाही स्नानासाठी निल पर्वताच्या पायथ्यापासून मिरवणुकीला सुरूवात झाली. आखाडय़ांच्यावतीने मंडलेश्वर, महंत यांच्यासाठी चित्ररथ आकर्षक पध्दतीने सजविण्यात आले होते. अग्रभागी सोन्या-चांदीतील इष्ट दैवत, छत्र चामरे, सजलेले रथ असे दृश्य होते. ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष सर्वत्र सुरू होता. टप्प्याटप्प्याने आखाडे कुशावर्त तीर्थाकडे सरकत होते. अंतिम शाही पर्वणीत नगरीकडून कोणतीही कसूर राहू नये यासाठी त्र्यंबकवासियांनी शाही मार्गावर नक्षीदार रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मिरवणुकीत भाविकांनी सामील होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असतानाही काही भाविकांनी मिरवणुकीत शिरकाव केलाच. अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक झाली. काही ठिकाणी पोलीस आणि भाविकांमध्ये वादावादी झाली. कुशावर्त परिसरात रेटारेटी झाल्याने काही महिला खाली पडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परंतु, पोलिसांनी त्वरीत परिस्थिती पूर्ववत केली. आधीच्या दोन पर्वण्यांच्या तुलनेत प्रत्येक आखाडय़ासमवेत सहभागी झालेल्या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. परिणामी शाही स्नानाचे नियोजित वेळापत्रक कोलमडले. पंच दशनाम जुना आखाडा, पंचायती आवाहन, अग्नी,  निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल, बडा उदासीन, नया उदासीन, निर्मल, याप्रमाणे क्रमवारीनुसार दुपारी १२ पर्यंत आखाडय़ांच्या साधू-महंतांचे स्नान झाले. प्रत्येक आखाडय़ाचे कुशावर्त तीर्थावर पुरोहित संघाकडून मंत्रोच्चारात स्वागत करण्यात येत होते. वैष्णवांसाठी ठेवण्यात आलेल्या राखीव वेळेत ते कोणीही न आल्याने या वेळेचा उपयोग पोलिसांकडून  आखाडे आणि भाविकांच्या स्नानासाठी करण्यात आला. दरम्यान, पहाटे अडीचच्या सुमारास शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्नान केले.
नाशिक-त्र्यंबक रस्ता बंद
त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनाने दुपारी १२ पर्यंत नाशिक-त्र्यंबक रस्ता प्रवासी वाहतुकीसाठी बंद ठेवला. यामुळे कमालीचे हाल झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वाहतूक बंद झाल्यामुळे संपूर्ण मार्गावर बसगाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ तिष्ठत बसलेल्या शेकडो प्रवाशांनी पायी चालत त्र्यंबक गाठले.
अधिकाऱ्यांचे ‘फोटोसेशन’
नााशिकची तिसरी पर्वणी आटोपल्यामुळे निवांत झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्र्यंबक येथे हजेरी लावत ‘फोटोसेशन’चा आनंद लुटला. नाशिकचेपोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पालिकेचे अन्य अधिकारी येथे उपस्थित होते. त्र्यंबकची पर्वणी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मोह त्यांना आवरला नाही.
नगरसेवक बघ्याच्या भूमिकेत
त्र्यंबक नगरपरिषद कुंभमेळ्यासाठी यजमानांच्या भूमिकेत असल्याने सर्व नगरसेवकांनी जांभळ्या रंगाचे ब्लेझर घालून आपली वेगळी ओळख करून दिली. पहिल्या पर्वणीत त्यांनी आखाडय़ांचे औक्षण करून स्वागत केले होते. अखेरच्या पर्वणीत मात्र या नगरसेवकांनी केवळ बघ्याची भूमिका स्विकारली. पेहराव तोच असला तरी भूमिकेत मात्र बदल झालेला दिसला.