नाशिक : शहराजवळील म्हसरुळ शिवारातील एका विहिरीत शरीराभोवती तारेच्या सहाय्याने वजनदार लोखंडी वस्तू बांधलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असून ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे.

नाशिक वनपरिक्षेत्रातील शेतकी गट क्रमांक १२५ मध्ये तारेच्या कुंपणाच्या आतमध्ये असलेल्या एका पक्क्या विहिरीत पाच ते सहा वर्षांच्या नर बिबट्याचा मृतदेह रविवारी शेतमजुरांना दिसला. घटनेची माहिती दुपारी वनविभागाला मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. वनकर्मचाऱ्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून म्हसरूळ येथील वन विभागाच्या केंद्रात विच्छेदनासाठी हलविला. याठिकाणी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांनी शवविच्छेदन केले. यावेळी काही अवयवांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सोमवारी हा व्हिसेरा न्यायसहायक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा…लोकसभेतील पराभूत उमेदवार विधानसभेत उमेदवारीपासून दूर

बिबट्याचा मृत्यू प्रथमदर्शनी संशयास्पद वाटल्याने शवविच्छेदन करण्यात आले आहे. अहवाल प्राप्तीनंतर याबाबत उलगडा होईल. बिबट्याचे सर्व अवयव हे शाबूत होते. त्याचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. शिकार केल्याचे स्पष्ट झाल्यास वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.

हे ही वाचा…नाशिक : माती खातो म्हणून गळा दाबला गेला, अन्…

प्रशांत खैरनार (सहायक वनसंरक्षक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांपेक्षा वेगळ्याप्रकारे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याच्या शरीराभोवती तारदेखील बांधलेली आढळून आली. – डॉ. वैशाली थोरात (पशुवैद्यकीय अधिकारी)