नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होणार आहेत. कोणती निवडणूक आधी आणि कोणती नंतर हे अद्याप निश्चित नाही. या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्ही पॅट’ यंत्राचा वापर केला जाणार नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एक जुलैपर्यंत राज्यात १० लाख मतदार वाढल्याचा अंदाज आहे.
मंगळवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूकपूर्व आढावा बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमांशी निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी संवाद साधला. राज्यातील महानगरपलिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सूचित केले. दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. ओबीसी आरक्षण सोडत पद्धतीने काढले जाईल. या निवडणुकीत व्हीव्ही पॅट यंत्रांचा वापर केला जाणार नाही.
महानगरपालिकेच्या एकाच प्रभागात मतदाराला चार उमेदवारांना मतदान करायचे असते. यात बराच वेळ जाऊ शकतो. यामुळे मतदारांच्या रांगा नियंत्रित करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. कोणतेही राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नसल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकांसाठी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र आणली जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदान यंत्रांची मागणी नोंदविली असून ती ऑक्टोबरनंतर प्राप्त होतील, असे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.
बैठकीत मतदार केंद्राची संख्या निश्चित करणे, मतदार यंत्र आणि साहित्य. अतिरिक्त सोयी सुविधा, मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रांवर सामान्य आणि अपंग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन संभाव्य किती मतदान यंत्रांची आवश्यकता लागणार आहे, याची मागणी नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात लोकसंख्या, मागील निवडणूकीवेळी असणारे मतदान केंद्र, संभाव्य मतदान केंद्र, तेथील सुविधा, मतदार यादी विभाजन आणि नियोजन आदींचा समावेश होता.