तरुणाई नाटक आणि रंगभूमी याचा गांभीर्याने विचार करत आहे. वैविध्यपूर्ण विषयांतून तरुणाईचे विचार या स्पर्धेच्या निमित्ताने समोर आले. विद्यार्थ्यांमधील सहज अभिनय आणि कलेची जाण ठळकपणे यावेळी लक्षात आली. या स्पर्धेमुळे तरुणाईला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून याद्वारे रंगभूमीला अनेक नवीन चेहरे मिळतील, असा आशावाद ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा होत आहे. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेसाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. मंगळवारी सायंकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिक विभागीय अंतिम फेरी रंगली. पाच महाविद्यालयीन संघात चुरस होती. त्यात केटीएचएम महाविद्यालयाची ‘वेटिंग फॉर सेन्सेशन’, क. का. वाघ महाविद्यालयाची  ‘१२ किमी’, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाचे ‘मनोहर साठेंचं काय झालं’?, जळगांव येथील मूळजी जेठा महाविद्यालयाची ‘अरण्य’ आणि हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयाची ‘ब्रेकिंग न्यूज’ यांचा समावेश होता. या एकांकिकांना आवर्जून उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांच्याच शब्दात.

लोकसत्ता लोकांकिका रुजली..

या स्पर्धेत नेहमीच दर्जेदार एकांकिका पाहायला मिळतात. पहिल्या फेरीत परीक्षकांकडून मिळणाऱ्या सूचना स्पर्धकांना खूप काही शिकवतात. त्यातून आपण नेमके कुठे आहोत हे समजते. एकांकिकेत नेहमी वेगळे विषय पाहायला मिळतात. आजच्या तरुणाईचा आवाज यामध्ये असल्याने एक प्रकारची ईर्षां आहे. ती अनुकूल असून नाटक व रंगभूमीचा यामध्ये गांभीर्याने विचार होत आहे. विद्यार्थी या निमित्ताने लिहिते होत असून दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा यासह विविध बाजू सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना ‘लोकांकिके’च्या व्यासपीठावर गेलो ही अभिमानाची गोष्ट वाटते.

प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे

विषयांत विविधता

लोकांकिकेच्या विभागीय फेरीतील सर्वच प्रयोग चांगले झाले. विषयात विविधता असून आजची पिढी काय विचार करते हे पाहण्याची संधी या माध्यमातून प्रेक्षकांना मिळते. प्रत्येक एकांकिका चांगली होती. मुख्यत कोणत्याही विषयाची पुनरावृत्ती नव्हती की कोणत्या मोठय़ा कलाकाराची त्यात नक्कलही नव्हती. विषय. कलाकार. नेपथ्य. विचार.. सर्व काही नवे. तितक्याच ताकदीने झालेले सादरीकरण प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारे होते.

श्रीकांत धिवरे (पोलीस उपायुक्त)

युवा वर्गासाठी उपयुक्त

तीन वर्षांपासून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा नवोदित कलावंताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. लेखन, दिग्दर्शन, कलावंत सारे नवे चेहरे असले असले तरी त्यांची व्यक्त होण्याची पद्धत, देहबोली, भाषेवरील पकड, विषयाची मांडणी, दैनंदिन घडामोडीतील वेगवेगळे विषय महत्त्वपूर्ण आहेत. एकांकिका स्पर्धा आणि सादरीकरणाचा दर्जा सर्वोत्तम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धक मित्र यामध्ये समोरचा काय सादर करत आहे, याचे निरीक्षण करतोय, योग्य ठिकाणी त्याला दाद देत असल्याने खिलाडूवृत्ती वाढत आहे हे महत्त्वाचे.

श्याम पाडेकर (निवेदक, ज्येष्ठ रंगकर्मी)

उत्तम सादरीकरण

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून नाटय़ क्षेत्रात नव्या दमाच्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. विभागीय फेरीत ज्यांनी सहभाग घेतला ते नवखे असले तरी सादरीकरणाचा दर्जा, अभिनय उत्तम होता. तरुणांची स्पंदने या माध्यमातून व्यक्त होत आहे. मुलांमध्ये रंगभूमीविषयी आवड निर्माण होत असून या माध्यमातून नाटकास आवश्यक असणारी ऊर्जा पाहायला मिळाली.

डॉ. कैलास कमोद (माजी अध्यक्ष, ओबीसी विकास महामंडळ)

विषय मांडण्याचे कसब

या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे कमी कालावधीत अगदी थोडय़ा वेळात विषय मांडण्याचे कसब या नव्या कलावंतांनी अंगीकारले आहे याचे कौतुक वाटते. विषयांची मांडणी करतांना ती पाल्हाळिक, अलंकारिक न करता मुद्देसूद मोजके काही दृश्य आणि चौकटीचा विचार करून होत आहे. नेपथ्य वापरताना काही त्रुटी राहत असतील, पण व्यावसायिकतेची जाण नसलेल्या हौशी रंगकर्मीनी एखादा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

नीलेश देशपांडे (प्रेक्षक)

नाशिक विभागीय अंतिम फेरीचा निकाल

  • सवरेत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – ब्रेकिंग न्यूज (हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालय, नाशिक)
  • सवरेत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – ‘१२ किमी’ (क. का. वाघ महाविद्यालय, नाशिक)
  • सवरेत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – वेटिंग फॉर सेन्सेशन (केटीएचएम महाविद्यालय, नाशिक)
  • सवरेत्कृष्ट दिग्दर्शक – भक्ती आठवले आणि मल्हार देशमुख (ब्रेकिंग न्यूज)
  • सवरेत्कृष्ट लेखक – प्राजक्त देशमुख (१२ किमी)
  • सवरेत्कृष्ट अभिनय (स्त्री) – वैशाली खाटीकमारे (१२ किमी)
  • सवरेत्कृष्ट अभिनय (पुरूष)- शुभम बेलसरे (अरण्य, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव)
  • सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना – प्राजक्ता गोडसे व ओवी भालेराव (ब्रेकिंग न्यूज)
  • सवरेत्कृष्ट नेपथ्यकार – ललित नाठे (वेटिंग फॉर सेन्सेशन)
  • सवरेत्कृष्ट संगीत – वेदांग जोशी (ब्रेकिंग न्यूज)

युवकांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आजच्या युवकांमध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विपुल कौशल्य असून अतिशय आत्मविश्वासाने ते वावरतात. वयाच्या मानाने त्यांची अभिनयाची समज, कलेची जाण, सहज नैसर्गिक अभिनय हे कौतुकास्पद आहे. लोकांकिकेमुळे त्यांना एक व्यासपीठ मिळाले असून यातून रंगभूमीला नवे चेहरे मिळतील अशी आशा आहे. ‘लोकसत्ता’चा उपक्रम अभिनंदनीय आहे.

अपूर्वा जाखडी (अंतराळ अभ्यासक)