भगवान ऋषभदेवाच्या १०८ पूर्णाकृती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा; आजपासून धार्मिक विधींना सुरुवात
बागलाण तालुक्यातील जैन धर्मीयांचे श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतात असलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ पूर्णाकृती मूर्ती प्राणप्रतिष्ठा, महामस्ताभिषेक सोहळ्यासह अन्य धार्मिक विधींना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने सप्ताहात विविध विधींचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. स्वतंत्र धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मांगीतुंगी नगरी सज्ज झाली आहे. यानिमित्त परिसरात स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून रोषणाई, ध्वज, पताका, सनई चौघडय़ांसह मंगलवाद्यांच्या सुरांनी परिसर मंगलमय झाला आहे. या सोहळ्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
हा सोहळ सप्ताहभर सुरू राहणार असल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी अडीचशे एकर भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपाची निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. छोटेखानी गाव तयार करत या ठिकाणी पर्यावरणपूरक ‘उडन’ तंबू तसेच स्वच्छतागृह, प्रसाधनगृह यासह प्रथमोपचार, मदत केंद्र, मोफत भोजन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजन संध्या, नाटिका, पाळणा, बालक्रीडा आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यात गुरुवारी ध्वजारोहण, शुक्रवारी अभिषेक, नित्यपूजन, याग मंडल व नवग्रह होम, १३ तारखेला गर्भकल्याण, अयोध्या येथील सर्वतोभद्र महल महाराणी मरुदेवी द्वारा स्वप्नदर्शन, रविवारी जन्मकल्याण, ऐरावत हाथी शोभायात्रा, जन्माभिषेक, सोमवारी भिक्षा कल्याण, देश विदेशातील राजे-महाराजे यांच्या उपस्थितीत भेच व नृत्य सादरीकरण सोहळा तसेच ज्येष्ठ गायिका कविता पौडवाल यांच्या संगीत संध्येचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी केवलज्ञान कल्याणक, र्तीथकर महामुनी ऋषभदेव यांची आहारचर्या, बुधवारी मोक्षकल्याण पूर्णाहुती हे कार्यक्रम होणार आहेत. सहा मार्चपर्यंत महामस्ताभिषेक सोहळा सुरू राहील अशी माहिती मांगीतुंगी ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.
या कार्यक्रमांसाठी मांगीतुंगी या दोन्ही पर्वतांच्या पायथ्याशी एक लाख चौरस फुटाचा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गापासून मांगीतुंगीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले आहे. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील फाटय़ापासून १५० बसगाडय़ांचा ताफा भाविकांसाठी सज्ज आहे. वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत साधारणत: दररोज एक लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता नाकारता येत नाही.
या पाश्र्वभूमीवर, वाहतूक मार्गात काही अंशी बदल करण्यात आले आहेत. या महोत्सवाचे निमंत्रण पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
या सोहळ्यात प्रमुख मान्यवर सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सहा जिल्ह्य़ांतील बॉम्बशोधक व नाशक पथकाने दोन दिवसांत हा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. १०० पोलीस अधिकारी, ८०० कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक यांच्यावर या सोहळ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी राहणार आहे.
वाहतूक मार्गात बदल
विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील पिंपळनेर ते ताहाराबाद दरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मनमाड- चांदवड- देवळा- सटाणा- ताहाराबाद- पिंपळनेर- दहिवेल- नवापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. त्या ऐवजी नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी मनमाड- मालेगाव- धुळे- कुसुंबा- नेर- साक्री- दहिवेल- नवापूर या मार्गाचा वापर करावा. नाशिककडून सोग्रस-भावडबारी घाट- देवळा- सटाणा- ताहाराबाद- पिंपळनेर- दहिवेल- नवापूर या मार्गाऐवजी नाशिक- पिंपळगाव- चांदवड- मालेगाव- धुळे- कुसुंबे- नेर- साक्री- दहिवेल- नवापूर या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.