जळगाव – जनावरांवर आढळून येणाऱ्या विषाणूजन्य लम्पी त्वचा रोगाचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला असून, संबंधित सर्व पशुपालक कमालीचे धास्तावले आहेत. दरम्यान, लम्पीचा प्रसार होण्यापूर्वीच नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण, गोठ्याची स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि रोगावर वेळीच उपचार करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे.
लम्पी त्वचा रोग हा प्रामुख्याने गाय वर्गीय जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा विषाणूजन्य व साथीचा आजार आहे. त्याचा प्रसार कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे जास्तकरून होतो. विषाणू वाहक डास, माशा, गोचीड, चिलटे तसेच बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, जखमा आणि स्त्रावांद्वारेही त्याचा प्रसार होतो. लम्पी बाधित जनावरांना १०४ ते १०५ अंश सेल्सिअस ताप येतो. पायांवर सूज येते आणि जनावरे लंगडण्यास सुरूवात करतात. ताप उतरल्यावर दोन ते पाच सेंटीमीटरच्या गाठी अंगभर दिसतात. भूक मंदावल्यामुळे जनावरे चारा खात नाहीत. गायींचे दुध उत्पादन घटते. डोळे व नाकातून स्त्राव बाहेर पडतो. अशी सर्व लक्षणे जळगाव जिल्ह्यातील एरडोल, धरणगाव आणि पारोळा तालुक्यातील जनावरांमध्ये सद्यःस्थितीत आढळून आली आहेत. लम्पी बाधित जनावरांची संख्या सध्या मर्यादित असली, तरी रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके गावागावात भेट देत आहेत. बाधित जनावरांवर तातडीचे उपचार करण्यासह लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधण्याचे आवाहनही पशुपालकांना केले जात आहे.
लम्पीवरील उपचार आणि व्यवस्थापन
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने लम्पीवरील उपचार आणि व्यवस्थापन, याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार, लम्पी बाधित जनावरांचे तत्काळ विलगीकरण करावे. त्यांच्यावर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. जनावरांना हिरवी वैरण, पेंड, खनिज मिश्रण, हर्बल लिव्हर टॉनिक, प्री-प्रो बायोटिक्स देऊन प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या उपायांवर भर द्यावा. जखमांवर ड्रेसिंग करावे. मीठ टाकून गरम केलेल्या पाण्याचा जनावरांच्या सुजलेल्या पायांना शेक द्यावा. मॅग्नेशियम सल्फेट व ग्लिसरीनचा लेप लावावा. नाकातील चिकट स्त्रावासाठी बोरोग्लिसरीन व गरम पाण्याची वाफ उपयुक्त ठरते, असा सल्ला जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिला आहे.
लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना
गाय वर्गीय जनावरांना लम्पी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. गोठ्याची दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. प्रत्येक गावातील जनावरांच्या गोठ्यात फवारणीची मोहिम ग्रामपंचायतीकडून राबविण्यात यावी. यासाठी एक टक्का फॉर्मलीन, दोन ते तीन टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा दोन टक्के फिनॉईल वापरावे. बाह्य कीटक नियंत्रणासाठी एक लिटर पाण्यात १० मिली करंज किंवा कडुलिंब तेल आणि साबण यांचे मिश्रण फवारणीसाठी वापरावे. नवीन जनावरे खरेदी करताना बाजार किंवा यात्रांमध्ये जाणे टाळावे. लम्पीची लक्षणे दिसणाऱ्या जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास रोगाचा प्रसार कमी होतो. हा आजार लपवून न ठेवता त्वरित स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. मृत जनावरे साधारण आठ फूट खोल खड्ड्यात चुना टाकून पुरावी. बाधित गायींच्या वासरांना थेट सडावाटे दूध पाजणे टाळावे, असेही जिल्हा उपायुक्त डॉ. झोड यांनी म्हटले आहे.