जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पुन्हा गर्तेत ; नवीन निर्बंधांचा फटका

राज्य शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा गर्तेत सापडला आहे.

नाशिक : दोन वर्षांपासून करोना संसर्गामुळे लादली जाणारी टाळेबंदी, निर्बंध यामुळे वेगवेगळय़ा क्षेत्रांना याचा फटका बसत आहे. पर्यटन व्यवसाय यापैकी एक. राज्य शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा गर्तेत सापडला आहे. याबाबत शासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मार्च २०२० पासून पर्यटन व्यवसायिक प्रचंड अडचणीत आलेले असून पर्यटक फिरायला जाण्यासाठी तयारी करतात. परंतु, ठरावीक कालावधीत येणाऱ्या करोनाच्या लाटांमुळे पर्यटक परत विचार बदलतात.

पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीनंतर इतर बरेच व्यवसाय लगेच रुळावर आले. परंतु, पर्यटनासाठी घर सोडून बाहेर जावे लागते. प्रवास करावा लागतो, बाहेरचे जेवण घ्यावे लागते. अशा अनेक बाबींमुळे पर्यटक धास्तावलेले आहेत. दोन वर्षे घरात बसून कंटाळलेले बरेच पर्यटक मनाचा हिय्या करून नोंदणीसाठी येतात. परंतु, सहलीला प्रत्यक्ष जातीलच असे नाही.  या सततच्या अनिश्चिततेमुळे पर्यटन व्यावसायिकही धास्तावले असून अनेक पर्यटन व्यावसायिक चांगला चालू असलेला व्यवसाय बंद करून बेरोजगार झाले आहेत. यात शासकीय पातळीवर कुठलीही मदत मिळत नाही. तशी पर्यटन व्यावसायिकांना अपेक्षाही नाही. एकीकडे सर्व दैनंदिन व्यवहार चालू ठेवण्यात येतात. मग फक्त पर्यटनावरच गदा का येते, असा प्रश्न व्यावसायिकांकडून विचारण्यात येत आहे.

वास्तविक करोना हा काही सहजासहजी संपणारा विषय नसल्याने आता शासनाने यावर कायम स्वरूपी उपाययोजना करावी. काही प्रमाणात निर्बंध आणण्याची गरज असली तरी सर्वकाही सरसकट पूर्णपणे बंद करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर फिरकण्यास बंदी केली आहे. या ठिकाणी गर्दी,  पर्यटक आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, नाशिक जिल्ह्यास मिळालेले नैसर्गिक वरदान पाहण्यास बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातूनही पर्यटक मोठय़ा प्रमाणावर येत असतात. जिल्हा सध्या पर्यटकांना आकर्षित करण्यात आघाडीवर असताना अशा प्रकारच्या निर्बंधामुळे पुढे झालेल्या नोंदणीवर परिणाम होतो. जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्व रिसॉर्टस फुल आहेत. पण पर्यटन स्थळांवर बंदी आल्याने आता त्यावर परिणाम होईल. माणसाच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचे काही नाही. पण नियंत्रण ठेवूनही पर्यटन चालू राहू शकते. तरी याबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी कोकण पर्यटनचे दत्ता भालेराव यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra tourism business face crisis after government imposed new restrictions zws

Next Story
उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला यश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी