‘बम बम भोले..’च्या गजरात सोमवारी भल्या पहाटेपासून त्र्यंबकेश्वरसह नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. या निमित्त बहुतांश मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिरात पहाटे तीनपासून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. गंगापूर येथील सोमेश्वर मंदिरात दुपारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनीही पूजा केली. यावेळी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे साधारणत: अर्धा तास भाविकांना तिष्ठत राहावे लागले.
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दर्शन घेतले. वित्तमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार ते शासकीय हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. परंतु दुष्काळात या मुद्दय़ावरून ओरड होईल हे लक्षात घेऊन ऐनवेळी ते मोटारीने दाखल झाले. शेतकरी व नागरिकांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना केल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले. त्र्यंबकमध्ये भाविकांसाठी मोफत चहापान, फराळाचे पदार्थ आदींची व्यवस्था दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांकडून करण्यात आली. परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडून भाविकांचा प्रवास सुखद केला. दरम्यान, कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस फौजफाटाही मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वरप्रमाणे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. नाशिक शहरातील श्री कपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर आदी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले. पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटे श्रींना अभिषेक करण्यात आला. सायंकाळी श्री कपालेश्वर महादेवाची मिरवणूक काढण्यात आली. सोमेश्वर मंदिरात दुपारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. या पूजेमुळे मंदिर दर्शनासाठी काही काळ बंद ठेवण्यात आले. याचा फटका दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना सहन करावा लागला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या उभारण्यात आल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.